पुस्तक परिचय
दुःख दारिद्र्यासह पोटाच्या भुकेच्या वेदना असलेला कवी पी.के . पवार यांचा काव्यसंग्रह 'आक्रोश '
____________________
बंजारा समाजाच्या छोट्याशा तांड्यामध्ये जन्म झालेल्या कवीचं बालपण अत्यंत हलकीच्या परिस्थितीत गेलं पण तरीही शिक्षणाचा ध्यास कवीच्या मनात होता .प्राप्त परिस्थितीवर मात
करुन कवीने शिक्षण पूर्ण केलं समोर आलेल्या दुःखद प्रसंगाशी सामना करत कवी जगणं शिकला ,अनुभवाच्या जोरावर मार्गक्रमण करीत शिक्षणातून पुढे शिक्षक पदापर्यंत पोहोचला पण मनाची व्यथा दुःखद दारिद्र्य अनुभवलेलं भोगलेल सगळं मांडण्यासाठी कवी शब्दांचा आधार घेतो आणि त्या शब्दांमधूनच प्रकट झालेला कवीचा पहिला काव्यसंग्रह 'आक्रोश ' हा आहे .
गोर बंजारा प्रकाशन कळमेश्वर यांनी कवी पुंडलिक कनीराम पवार यांचा 'आक्रोश ' नावाचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे .कवी सध्या सोनाजी महाराज हायस्कूल सोनाळा ता . संग्रामपूर जि . बुलढाणा येथील विद्यालयात अध्यापनाचा कार्य करीत आहे .
'आक्रोश ' हा ३४ कवितांचा काव्यसंग्रह आहे .
कवी म्हणतो ,
'मानवाच्या जीवनाचा
अर्थ नाही कळत
दारिद्र्याचे नशीब
कधी नाही का ? फळत '
कवीचा हा आक्रोश समस्त मानव जातीसाठी आहे .
स्त्रियांच्या वेदना शेतकऱ्याची दुःख आणि एकूणच व्यवस्थेवर कवी 'आक्रोश ' शब्दांच्या माध्यमातून करीत आहे .
वास्तव परिस्थितीवर भाष्य करताना कवी म्हणतो ,
'उजेडात पुण्य होतात
अंधारात पाप
दुबळ्यांचा जीव घेतात
बलवान साप '
कवीची ही व्यथा दिनदुबळ्यांसाठी आहे .
कर्तव्य करीत राहणे आणि कर्तव्यातच सारं काही यश मिळत जातं . भेदभाव करुन कोणाचं भलं झालं नाही हे सांगताना कवी म्हणतो ,
'जातीत काही नाही
वर्णात काय आहे
हेभेदाच काही नाही
सर्वात देव आहे ' .
समाजाच्या व्यथा वेदनांना
वाचा फोडण्याचा काम कवीने आक्रोश या काव्यसंग्रहातून केलेला आहे .
आक्रोश या काव्यसंग्रहात आई , बापू ,पतंग ,अंतर ,इर्षा ,निवेदन , बळी , चिंतन , स्वाभिमान , विचार कर ,स्मरण , वस्ती ,प्रतीक्षा वारंगना ,मायामंत्र ,नोकरी , आयुष्याची घड्याळ , आक्रोश , अमर जवान , जगणं ,चला ऊठा तर , वास्तव्य ,देणे ,बहुजन नायक , विशाखा ,हेलकावे , सार , वाद ,भ्रम ,पश्चाताप ,परहित ,एक शाप ,तारुण्य ,एक प्रसंग नायगाव
या शीर्षकाच्या कविता कवीच्या मनातील विचार व भावना प्रकट करतात .
'बळी ' ही कविता आर्जव व संघर्षातून नवा आशावाद निर्माण करते . कवी म्हणतो ,
'जनते करवी अन्न उपजवू
संकोच न आम्ही करु
या प्रजेच्या जीविताकरवी
नांगर हाती धरु
सोसू आम्ही दर्द वेदना
कधी न सोडू धीर
कर तू साह्य देवू आम्ही
विपुल अन्न रुचीर '
आक्रोश या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून कवी पिके पवार यांनी मराठी साहित्यात दमदार पाऊल ठेवलं आहे .त्यांच्या साहित्य लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा .
____________________
एकनाथ लक्ष्मण गोफणे
चाळीसगाव
8275725423
Comentários