top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

काव्यसंग्रह . 'कविता धरणाआधी आणि नंतरच्या ' .. !

पुस्तक परिचय : -

विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबांची अवहेलना वाचकांना दाखविणारा काव्यसंग्रह .

'कविता धरणाआधी आणि नंतरच्या ' .. !

___________________

वसंत पाटील पणुंब्रे ( सांगली )

यांचा काव्यसंग्रह आहे . 'कविता धरणाआधी आणि नंतरच्या ' .. !

तेजश्री प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाला कविने देश विकासासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या सर्व धरणग्रस्तांना आणि आईस हा काव्यसंग्रह अर्पण केलेला आहे .

एक ते एकावन्न अशा संख्यानाम शिर्षकाच्या ५१ कविता असलेल्या या काव्यसंग्रहात एखाद्या गावात धरणाच्या निर्मिती आधी असलेली सुख संपन्नता आणि धरणानंतर आलेलं विस्थापित जीवन संघर्ष व

अस्वस्थ मनाची अवस्था याचं वर्णन या काव्यसंग्रहात कवीने शब्दबद्ध केले आहे .

कवीला बालपणी जात्यावर आईच्या मुखातून ऐकलेल्या ओव्या आणि देवळात भजनात रममाण होणाऱ्या वडिलांच्या मुखातील अभंग आणि श्रावण महिन्यात घरी चालणाऱ्या रामायण महाभारत कथा श्रवणाने साहित्य विषयक गोडी निर्माण झाली आणि त्यातून लेखनाकडे वसंताची लेखणी बहरली .अनुभवातून समृद्धी त्या लेखणीने घेतली . हेच अनुभव जगणं आणि जगण्याचा संघर्ष या एकावन्न कवितांमध्ये दिसून येते .

कवितेतून स्त्रीमनाची व्यथा , शेतकऱ्याची धडपड , भावभावनांचा गुंता ,विस्थापित अवस्था मनाची घालवेल ,सर्वसामान्य माणसांचे जीवन संघर्ष , नात्यांचा स्पर्श , विद्रोह , गावाचं गावपण व आठवणी , रोजच्या भाकरीसाठी असलेली लढाई , धरणाच्या निर्मितीनंतरचं जगणं , लढण्याची प्रेरणा या काव्यसंग्रहात कविने शब्दात बांधून ठेवले आहे .

कवी म्हणतो ,

'धरणाची आवई

गावा गावात गेली

पुनर्वसनाचे भीतीने

अनेकांनी घेतले खाली .

घरदार बुडणार

जाणार ही शेतीवाडी

परक्या गावात पुन्हा

जगण्याची नवी कोडी .

धरण निर्मितीसाठी गाव स्थलांतर

करण्याची वेळ येते . तेंव्हा गावात राहणाऱ्या माणसांच्या मनाची व्यथा कवीने आपल्या शब्दात व्यक्त केली आहे .

धरणाच्या निर्मितीनंतरची स्थिती

एकोणतीस या शीर्षकाच्या कवितेत व्यक्त करतांना कवी म्हणतो ,

'धरणानंतर अनेकांची

कशी झाली वाताहत

गावामध्ये नाही घर

शेतामंदी नाही शेत .

पाण्यासाठी केली ज्यांनी

घरादाराची कुर्बानी

झगडून मिळवावे लागते

त्यांना पिण्यासाठी पाणी . '

धरणाच्या निर्मितीमुळे उपलब्ध पाण्यावर सिंचन सुविधा मिळाल्याने नदी प्रवाहाच्या पुढील अनेक गाव सुखी संपन्न होत असतात पण ज्या गावांनी हे बलिदान दिलं .धरणाच्या निर्मितीसाठी आपल्या जमिनी दिल्या स्वतः विस्थापित झाले त्यांची अवस्था कवीने पस्तीस या शिर्षकाच्या कवितेत मांडलेली आहे .

'एका धरणामुळे

कितीतरी जणांचं भलं होतं पाण्याखाली बुडलेल्यांच जगणं मात्र

मुश्किल होतं.

एक पिढी संपून

दुसरी आली

रोजंदारी करत करत . ती सुद्धा बरबाद झाली

हक्काची देय जमीन मिळण्यासाठी

हेलपाटे घालून थकलेला बाप पुनर्वसन साहेबाला शेवटी

विचारतो जाब

तेव्हा पुनर्वसनाचा सर्कल देय जमिनीचा टेबलाखालून ठरलेला एकराचा दर सांगतो

हे ऐकून बाचं टाळकच फिरतं .

सायब ! घर जमीन आमचं

सारं काही गेलं म्हणून हक्काची देय जमीन मागतो आहे

तुमची विक्रीची नाही !

असं म्हणून ताडकन

ऑफिसातून बाहेर पडतो आणि म्हणतो काय मर्दा घेऊन बसलास पुनर्वसनाचे जी .आर . आणि कायदे !

धरणात गेलेल्या जमिनीसाठी

शेतकऱ्यांचा संघर्ष हा शासनाशी आहे .त्यासाठी लढण्याची प्रेरणा घेऊन कवी म्हणतो

'हात झटकून मोकळे झालात आता ,

उलटाही फिरतो आहे

नांगर आमचा

विधानभवनाच्या दिशेने

आणि फिरणार नाही परत

तुमच्या कर्तव्याची मशागत केल्याशिवाय . '

कवी वसंत पाटील यांनी अनुभवाचे बोल या काव्यसंग्रहाद्वारे मांडलेले आहेत .

एखादं धरण तयार होतं त्याच्या मुबलक पाण्यामुळे निर्माण झालेली

हिरवळ व आलेली समृद्धी पर्यटकांना दिसते पण त्या धरणामुळे विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबांची अवहेलना . कवी वसंत पाटील यांच्या काव्यसंग्रहातून मराठी साहित्यात वाचकांना दिसते .

कवी वसंत पाटील यांच्या साहित्य लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा .

___________________

✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे

📲8275725423

चाळीसगाव .



"कविता धरणाआधी आणि नंतरच्या.. या कविता संग्रहावर आधारित कार्यक्रम "कविता मनामनातली " भाग-1 ते 3 निर्मिती आणि सादरीकरण मा. एकनाथ गोफणे यांचे आहे . 🌹🌻🌹🌹कार्यक्रम

लिंक खाली देत आहे.


लिंक वर क्लिक केल्यावर सर्व भाग ऐकता येईल




27 दृश्य0 टिप्पणी

Kommentare


bottom of page