top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

गोरबंजारा संस्कृतीच्या होळीची वैभवसंपन्नता ¤ ********************************** ✍️ : डाॅ.वसंत भा राठोड, किनवट.

¤ गोरबंजारा संस्कृतीच्या होळीची वैभवसंपन्नता ¤

**********************************

✍️ : डाॅ.वसंत भा राठोड, किनवट.

मो. नं. : - 9420315409.

**********************************

जगाच्या पाठीवर एक स्वतंत्र संस्कृती, बोलीभाषा, पोशाख,गीत संगीत, नृत्य, वाद्यवृंद, खानपान (लापड, चिलवा ,कडाव, चुरमो, सळोयी, नारेजा इत्यादी) न्याय निवाडा ,गोरपंचायत आणि अस्तित्व जपणारा समाज म्हणजे गोरबंजारा समाज होय. प्रत्येक सण, उत्सव, समारंभ निहाय या समाजाची संस्कृती, गीत,संगीत, नृत्य कलाविष्कार वेग वेगळे आहेत. त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण सण म्हणजे होळी (सिमगा) होय. या सणाचे महत्त्व फार अनन्य साधारण असे आहे. केवळ नाचणे,गाणे, खाणे, पिणे येवढेच नसून पितृजन, पूर्वजांची मनोभावे आराधना (भोग विधी 'अग्नी पुजा नैवेद्य ') करणे. नवीन जन्माला आलेल्या बाळांचा धुंड विधी करून आई वडीलांची जाणीव, नेणीव निर्माण करून देणे. कुणी मृत्यु पावला असेल तर त्यांचे दुःख, नैराश्य, दैन्य नाहीसे करून त्यांना होळी या महत्वपूर्ण समारंभात वाजत, गाजत सहभागी करून घेणे. त्याच बरोबर कुणाचे वैरभाव, रूसवा फुगवा,कडाक्याचे भांडण झाले असेल तर त्यांच्यातील अबोला मिटवून सौहार्दपूर्ण राहण्याची शिकवण देणारा हा महत्त्वपूर्ण सण आहे.

" बार रं मिनाम, आयीर होळी ,

होळी खेला रं झोकेती. "

" आवोरे डावे साणे आपण खेला होळी "

" काका, दादा रिस मत करजो, आपण खेला होळी. "

" काकी,दादी रिस मत करजो, आपण खेला होळी. "

(अर्थात :- माझे काका, दादा आप्तजन डावे, उजवे, समजदार तूम्ही राग, रुसवा न धरता होळीत सहभागी व्हावे)

म्हणून गोरबंजारा समाजाच्या दृष्टिकोनातून हा सण अतिशय जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेला संस्कृतीसंपन्न व वैभवपूर्ण असा तिन दिवस चालणारा समारंभ आहे.

या तिन दिवस चालणाऱ्या सणात सर्वात वैविध्यपूर्ण धमाल नृत्य म्हमजे लेंगी नृत्य होय . विशिष्ट प्रकारचे गाणे गात महिला, पुरुष स्वतंत्रपणे फेर धरून डपड्याच्या तालावर नृत्याविष्काराची उधळन करतात. या लेंगी गीताच्या माध्यमातून नवीन पिढीला वैविध्य, वैशिष्ट्यपूर्ण शिकवण दिली जाते. श्रममुल्य व वेग वेगळे श्रमसंस्कार दिले जाते. (हल्ली आजचा तरूण भरकटल्या जाऊन विचारशुन्य होत आहे. आजच्या तरुणाईच्या झोळीला छिद्रच भयंकर आहेत त्यामुळेच ती वैभवशाली संस्काराने, कला ,श्रम संस्काराने भरतच नाही) शुरता, विरता, प्रजोत्पादकता, स्नेह, माया, ममता, कारुणिक, श्लील, अश्लील, लैंगिक सामाजीकरणाची जाणीव करून दिल्या जाते.

होळी या सणानिमित्त बंजारा समाजामध्ये सादर केल्या जाणाऱ्या लेंगी नृत्याला फार महत्वाचे स्थान आहे. साधारण होळीच्या पंधरा दिवस आधीपासून (म्हणजे माघ अमावस्येपासून ते थेट फाल्गुन मासातील अमावस्येपर्यंत ) या नृत्याची लगबग सुरू होते. होळीच्या नंतर सुद्धा पंधरा दिवस चालते.

ज्या प्रमाणे वसंत रुतू मध्ये सर्व निसर्गाची पतझड, पडझड होऊन नव्याने पालवी फुटायला लागते, अंकुरायला लागते. कापूस, ज्वारी, गहू, हरबरा व अन्य पिकांच्या गोण्या भरून श्रमाचे धन धान्य जमा करून माळरान भरकाडीची उनंगवाडी झालेली असते. तेंव्हा केसूला (पळस फुल) बहरायला लागतो. त्या झाडाला एकही पाने नसतात, तो संपूर्णत: भकास नी उजाड वाटायला लागतो. परंतू केशरी केसूला त्या झाडाला, निसर्ग सृष्टीला तळपत्या उन्हात नव्याने रंगाची उधळन करण्याची धाडस निर्माण करीत असतो व रानावनात राहणाऱ्या समाजामध्ये नव्या उमेदीनं जगण्याची उर्जा भरीत असतो. अगदी त्याच प्रमाणे गोर बंजारा समाजाचे लेंगी नृत्य या माळरानावर राहणा-या समाजामध्ये तप्त सूर्यदेवाच्या समवेत जगण्याची चेतना निर्माण करीत असतो.

" आंबा लागे आंबली खेराळी लागे गुंद बे,

गे-या तारी गेरणीर कोळा, कोळा छ... बे !"

या स्वरूपात श्लील, अश्लील लेंगीची लयबद्धता जन माणसी मंत्रमुग्ध करीत असते. केसूला जसा बहरत जातो त्या प्रमाणे होळीच्या पावन पर्वावर हे लेंगी नृत्य बहरत जाते. या तांड्यातल्या महिला, पुरूष (बैठी व खडी) बसून व उभे राहून स्वरचीत लेंगीनृत्य डपाच्या (हलगी) तालावर गाणे गात अनेक सुखा, दुःखाचे गीत गातात. डपड्याच्या ठेक्यावर फेर धरून धमाल नृत्य सादर करीत देहभान विसरून जातात.

या लेंगी मध्ये पारंपरिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक (सिकवाडीपर) गाणे डपाच्या तालावर गायील्या जाते व सोबतच पारंपरिक लोकनृत्य हे कलावंत झांज, ठोळी, काठी, शेला हातात धरून वेग वेगळ्या पद्धतीने नृत्य सादर करतात. हे कलावंत कोणत्याही प्रशिक्षणाविना एखादया पट्टीच्या नृत्यकाराला लाजवेल असे नृत्य करतात.

या लेंगी नृत्यामध्ये भांड लेंगी (थट्टा मस्करी करून स्त्री पुरूष एक मेकांना शिवी घालणे) हा सुद्धा एक महत्वाचा प्रकार आहे. यातून वर्षभरातला रूसवा, फुगवा घालविण्याचे महत्वाचे कार्य पार पाडल्या जाते. कुणा सोबत अबोला असेल तर या होळीच्या औचित्यावर त्यांना बोलते केल्या जाते. आपले संबध लोयी पाणीचे (रक्त पाण्याचे असून आपण गोर कुळीच्या धाग्याने विणल्या गेलेलो आहोत) आहेत. आपण रूसवा करून कसे चालणार ? तू माझा, आपला (आपणो मणक्या) माणूस आहेस. त्याला मैत्रीपूर्ण हाक देऊन, त्याच्या घरा समोर सर्व उभे राहून आम्ही आलो असे सूचक वक्तव्य करून बोंब मारतात व फेर धरून नाचायला लागतात.

बंजारा समाजामध्ये होळीचा सण उत्सव यासाठी महत्वाचा वाटतो की, दिवाळी पासून होळीपर्यंत तांडा वस्तीतील जेवढेही लोक वारले असतील, तेवढ्याही लोकांच्या घरी वाजत गाजत जाऊन त्यांना झालेल्या दुःखात सहभागी होतात. अशा दु:खी लोकांना होळीच्या उत्सवामध्ये सहभागी करून आपल्या समूहासोबत घेतात. त्याला दुःख, दैना विसरून जाण्याची शिकवण देतात आणि लेंगी नृत्य करावयास लावतात.

आणखी होळी सिमग्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तांड्यामध्ये वर्षभरात जांच्याकडे मुलगा जन्माला आला त्यांच्याकडे धुंड विधी (मुंज विधी) केल्या जाते. त्या मागचा हेतू हाच की रितसर हा मुलगा या दांम्पत्याचा आहे. याचे आजी आजोबा अमूक आहेत. त्याची वंशावळ, खानदान अमूक आहे. या सर्व बाबीची ओळख पटवून देऊन त्या बाळाला रितसर समाजामध्ये सहभागी करून घेतात व त्याला नावा रूपाला आणतात व त्याची नवीन ओळख निर्माण करतात.

साधारणतः होळीच्या दिवसी ज्यांच्याकडे बाळाची " धुंड विधी " आहे त्यांच्याकडे घोंगडीने मंडपावर (कंबळीच्या साह्याने मंडप घालणे) पाल ताणतात. हे मंडप तांड्यातील नायक, कारभारी, डावे, साणे (शहाणे समजदार) व बुजुर्ग पुरूष, महिला मंत्रोचार (नातरो) पध्दतीने मंत्राचे पठण करतात. त्या नंतर प्रसाद म्हणून गरमा गरम पुर्‍या तळतात याला गोर भाषेत ' सुंवाळी ' असे म्हणतात. या प्रसंगी स्त्री, पुरूष फेर धरून धमाल लेंगी नृत्य सादर करतात. स्त्रीयांना गेरणी व पुरूषांना गेरिया असे म्हणतात. ' गोर ' या समुह वाचक शब्दापासून वरील स्त्री व पुरुष बिरुद रूढ झाले आहेत. वास्तविक गोर या शब्दाचा अर्थ विचार, चालाख, चाणाक्ष असा होतो. विशेष करून ही नावे केवळ होळीच्याच सणाला वापरतात ; तेही धमाल नृत्यात सहभागी होणाऱ्या करीताच.

पहिल्या दिवसाची ही प्रक्रिया पार पडल्या नंतर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे होळी दहन केल्या जाते. या वेळेस तांडा समूहातील अविवाहित तरूणांना महत्वाचे स्थान असते. यातून दोन तरूणांची पेटत्या होळीतून (कु-हाडीचे) दांडके काढण्या करीता नेमणूक केली जाते. ही प्रक्रिया अतिशय वाजत गाजत पार पडते. या प्रसंगी पुरूष, महिला (गेरिया & गेरणी) पेटत्या होळीच्या आसपास धुमधडाक्यात गाणे गात पायी लेंगी नृत्य सादर करतात.

त्याच दिवशी सायंकाळी ज्यांच्याकडे धुंड विधी आहे त्यांच्याकडे त्यांच्या मुख्य दारासमोर अंगणात दोन मजबूत दोन अडीच फूट खोल खूंटे रवतात व त्या रवलेल्या खूंट्याला गेरीयाला उपसून काढावयास लावतात या प्रसंगी गेरणी हातात हिरवी फोग (काठी) घेऊन गेरीयांचा प्रतिकार करतात, गाणे म्हणत मारझोड करतात. जोपर्यंत रवलेले खुंटे उपसल्या जात नाहित तोपर्यंत हा खेळ चालूच असतो. ही खूंटे उपसण्याची विधी पार पडल्यानंतर गेरीया शिरा, पुरी, गुळ, खोबरा, खारीक (गरीब व श्रीमंत यांच्या ऐपतीनुसार) या प्रसादाचा मनमुराद आस्वाद घेतात. आरध्या रात्री पर्यंत बैठी व खडी लेंगी म्हणत झोपी जातात.

तिस-या दिवसी रंगाची उधळन म्हणजे धुळवड,फाग खेळतात केसूलाच्या केसरीया रंगाने न्हाऊन जातात. असे फाग खेळत तांड्यातील घरोघरी फगवा (होळीचे गेर, पैशाच्या स्वरूपात) मागतात. त्याच दिवशी नायकाच्या सम्मतीने होलीका बळी, सामत दादा, मिठू भूखिया ,रामचंद सात यांची पूजा म्हणून काळी बकरी व बकरा यांची बळी पूजा करून सम्मान (त्यात बळी पुजेचे सर्व अवयव आले पाहिजे) हिस्से पाडतात. मग त्यातूनच बकऱ्याच्या काही मोजक्या अवयवाचे सळोयी प्रसाद बनवितात. ते सर्वांना वाटतात.

त्याच रात्री पुन्हा ज्यांच्याकडे धुंड विधी आहे त्यांच्याकडे मदधुंदपणे नाचतात सामत दादा, मिठू भूखिया, नायक, कारभारी यांच्या अतुलनीय सांस्कृतिक वैभवी कार्याचे गुणगौरव करतात. शेवटचा वाजणा मंत्र म्हणून नायकाच्या सम्मतीने होळी उत्सवाची सांगता करतात. असा तिन दिवस हा होळी, सिमगा उत्सव चालतो.

मला कैक वेळेस लेंगी नृत्य सादर करणा-या महिला पुरूषांच्या समुहामध्ये सहभागी होता आले . गोरबंजारा समाजाचा पायीक नी घटक म्हणून हे प्रसिद्ध लेंगी नृत्य जवळून पाहता आले. कित्येक समूहामध्ये सहभागी होता आले. त्यांच्यात रममाण होऊन होळीचा आनंद द्विगुणित करता आला. गोरबंजारा समाजातील महिला, पुरुष दिल्ली येथे अपना उत्सव मध्ये जाऊन आले. त्यांनी आपली कला, संस्कृती, नृत्यप्रकार दिल्ली दरबारी दाखवून अनेक बक्षिसे मिळविली.

गोरबंजारा समाज रानावनात, माळरानावर, गिरीकंदरात राहून या डिस्को, डॉल्बीच्या जमान्यातही अफलातून कलाविष्काराची संस्कृती जोपासत आहेत. तांड्यातील लेंगी मंडळ, समूहाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. दिवसरात्र काबाडकष्ट, मोलमजुरी करून हा समाज अंगभर कला कुसरीचे वस्त्र परिधान करून, ही पुरातन हडप्पा, मोहेनजोंदडो कालीन कला, संस्कृती जोपासत आहे.

" झांज, डपडा केन केन रं सायी वं,

झांज डपडा नायकेन सायी वं,

नायकणेन सायी वं. " (अर्थात : झांज डपडा तांड्याचा प्रमुख नायक, नायकीण यांना प्रसन्न झाला पाहिजे तर बाकीचे तांडावासी आपोआपच प्रसन्न, सुखी, संपन्न होतील )

आज या दबलेल्या व मरगळलेल्या वैभवसंपन्न कला, संस्कृतीला राजमान्यता मिळणे आवश्यक आहे. गोरबंजारा समाजाची वैविध्यपूर्ण कलाविष्कारांनी नटले, थटलेली संस्कृती शासनाच्या राज मान्यते अभावी शेवटच्या घटका मोजत केवळ तांड्यापर्यंच मर्यादित राहिलेली आहे. रानावनात उरफोड मेहनत करून हा मेहनती, कष्टाळू समाज आपली पारंपरिक संस्कृती जोपासत आहे.

मुंबई, दिल्ली, नागपूर, पुणे, औरंगाबाद अशा अनेक शहरामध्ये मोठ मोठाले मेळावे, उत्सव, संमेलने घेऊन या कलावंतांना जगण्याची उभारी देणे आवश्यक आहे. जेणे करून ही वैविध्यपूर्ण संस्कृती जीवंत राहिल व कलावंतांना प्रोत्साहन व उत्तेजन मिळेल. हा कला प्रकार केवळ तांड्या पुरता सिमित न ठेवता जाणकार राजनेत्यांनी , अधिकारी, धनदांडग्यांनी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर रंगमंच मिळवून देण्याची किमया दाखविणे आवश्यक आहे.

अहोरात्र काबाडकष्ट, छातीफोड मेहनत करून हा कला प्रकार जोपासणे, वारंवार नृत्य, कवायत करून या महागाईच्या काळात कला जीवंत ठेवणे त्यांच्या नाकी नऊ आलेले आहे. जीवनाची, जगण्याची आभाळ होत असतांनाही तांड्यातील कलाकार कोणत्याही मानधना विना ही जगाच्या पाठीवरील दुर्मीळ कला , वैभवसंपन्न संस्कृती जोपासतो आहे.

समाज धुरिणांनी, पुढा-यांनी, शासनाने, समाज माध्यमांने सरकार दरबारी या अप्रतिम कलेची दख्खल घेणे आवश्यक आहे. गोरबंजारा समाजातील समाजमान्य वैभवसंपन्न संस्कृतीला राजमान्यता मिळवून देण्याकरीता आपले वदन नि करकमळ ज्ञानमार्गी लागणे आवश्यक आहे.

माझ्या अखिल भारतीय समाज बांधवांना आज होळीच्या सणानिमित्त तळहृदयातून शुभेच्छा 👏!

***********************************

शब्दांकन : डॉ. वसंत भा.राठोड, किनवट.

मो.नं. : - 9420315409.

***********************************


44 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page