गोरमाटी बोलीभाषा आणि शैली विज्ञान-
शैली विज्ञान हा प्रकार देखील समाजभाषाविज्ञानाचाच एक प्रमुख अंग असल्यामुळे भाषाविज्ञानाच्या अभ्यासातून शैली विज्ञान वगळता येणे शक्य होणार नाही.सौंदर्यशास्त्रीय अध्ययन शैली म्हणजेच शैली विज्ञान!
'भाषा आणि साहित्य यांना जोडणारी संकल्पना म्हणजे शैली'असे भाषावैज्ञानिक म्हणतात. गोरमाटी बोलीभाषा ही साहित्याच्या अंगाने बहरलेली आहे.'सेलीरो सणगार'अशा वाङ्मयीन थाटाची भरपूर उदाहरणे गोरमाटी बोलीभाषा व्यवहारात विखुरलेली आहेत.
गोरमाटी बोलीभाषा ही मूळात साहित्यिक भाषा असल्यामुळे तिचा शैली विज्ञानाच्या अंगाने अभ्यास होणे आवश्यक आहे.
गोरमाटी बोलीभाषा विज्ञानाचा अभ्यास करताना यांच्या मौखिक वाङ्मयाकडे दुर्लक्ष करताच येणार नाही,कारण स्त्री रचित मौखिक वाङ्मयात गोरमाटी बोलीभाषा व्यवहारातील भाषिक रूपांचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आढळतो.
कसीदाकारी वा हस्तकलेला गोरमाटी बोलीभाषा व्यवहारात "खील" असा स्वतंत्र पर्याय आहे.
तार याडी तोनं आचमाली खीली कोनी कायी को?
सासवांचा हा टोमणा नव वधूंच्या नशिबी असतो 'खील'हा शब्द या ठिकाणी 'संस्कार' या अर्थाने योजिलेला आहे.
अशा प्रकारचे शैलीगत अर्थाचे भरपूर उदाहरण गोरमाटी बोलीभाषा व्यवहारात आढळतात.
*तार कांयी फुंदा झडगे पच्..?*
गोरमाटी बोलीभाषा व्यवहारातील 'फुंदा'हा रूपिम मराठी 'गोंडा'या अर्थाने प्रचलित असून 'फुंदा'हा रूपिम गोरमाटी गण समाजाच्या रंगीन जीवनशैलीची ओळख स्पष्ट करणारा म्हणजे 'अस्मितेचे प्रतिक'कल्पिल्या गेल्यामुळेच "तार कांयी फुंदा झडगे पच्?" हा वाक्प्रयोग गोरमाटी बोलीभाषा व्यवहारात प्रचलित झालेला दिसतो.
गोरमाटी हा आपल्या 'बाराकसी'(बंडी) आणि आपल्या हातातील काठीलाही उलनी गोंड्याने सजवीत असतो.अंगावर सोन्या चांदीचे अलंकार नसले तरी चालेल,मात्र आपल्या अंगावरच्या बंडी आणि आपल्या हातातील काठीला उलनी गोंडे जोडून असणे याला महत्त्वाचे मानले जाते.
या आपल्या स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मितेच्या जीवनशैलीला गोरमाटी जीवापाड जपत आलाय..!
"तार कांयी फुंदा झडगे पच्?" म्हणजे 'तुझी बेअब्रू झाली का मग!'अशा अर्थाने हे वाक्य सिद्ध होते. 'फुंदा'हा रुपिम या ठिकाणी "बेअब्रू,अस्मिता" या अर्थाने सिद्ध होतो.
गोर धाटीत "बारामती"ला (बंडी) 'बारा फुंदा' (बारा उलनी गोंडे) जोडलेले असावे लागते.गोर धाटीत १२ या अंकाला महत्त्वाचे स्थान आहे. सिंधू संस्कृती ही 'द्वादशमानी'संस्कृती असल्याचे मानले जाते. गोर धाटीतील लग्नात वर - वधू पक्ष्यांनी साडे बारा रूपये गणसभेत जमा करावयाचे असते. 'शिव - सृष्टीच्या बारा ज्योतिर्लिंगांपासून (उर्जा शक्ती) गोरमाटी गण उत्पन्न झाल्याचे मानले जाते. *बारा झवन्यारो* या शिवीला प्राकृतिक संदर्भ आहे. "बाराकसीला बारा कस्से आणि या बारा कस्स्याला बारा फुंदा जोडलेले असावे लागते. यातील एक फुंदा जरी गळून पडला म्हणजे कमीपणाचे/अप्रतिष्ठित मानले जाते.
"तार कांयी फुंदा झडगे पच्?" या अभिव्यक्तीच्या मुळाशी हीच भावसुचकता आहे.
*शैली विज्ञान-*
गोरमाटी संस्कृती ही मुळात वाङ्मयीन संस्कृती आहे. सुखात गाणे.. दु:खात गाणे,गीत,गीद आणि संगीत ही या लोकगणांची जीवनशैली आहे. गोरमाटी मधून गीद,गीत आणि संगीत वजा करताच येणार नाही येवढा तो या जीवनशैलीशी एकरूप झालेला आहे.
गोरमाटी बोलीभाषेचा वैज्ञानिक अंगाने अभ्यास करताना यांच्या परंपरागत मौखिक वाङ्मयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही,कारण स्त्री रचित मौखिक वाङ्मयात गोरमाटी बोलीभाषा व्यवहारातील भाषिक रूपांचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला असल्याचे आढळून येते.
गोरमाटी बोलीभाषेत लोक गीताला "गीद"म्हणतात.गीद हे गोर स्त्रियांचे सहज 'बोलणे'असते.शैली विज्ञानाचा अभ्यास करताना ही बाब लक्षात घेणे आवश्यक असते.
*वीरा तो पामणो...*
*करेला लागे;लागे रेलाछेलरे...*
*करेला लागे...!*
भाऊराया पाहुणा तर आला;पण घरातील सासू सासरे आणि पतीशी अबोला असल्यामुळे घरचे वातावरण वेलीला लदबद लागलेल्या कडू कारल्याप्रमाणे झालेले आहे.
या लोक गीदाची नायिका आपले मनोगत कलात्मक शैलीतून व्यक्त करते.शैली विज्ञानाचे असे भरपूर प्रकार गोरमाटी बोलीभाषा मौखिक वाङ्मयात विखुरलेले आहेत.
गोर स्त्रियांनी आपल्या मौखिक परंपरेत व्यवहार भाषेचा वापर कलात्मक शैलीने केलेला आहे. 'गेयता'हे गोरमाटी बोलीभाषेचे प्रमुख लक्षण असल्यामुळे शैली विज्ञानाच्या अभ्यासातून मौखिक वाङ्मय वगळता येणे शक्य नाही. स्त्री रचित मौखिक वाङ्मयात व्यंजना,लक्षणा या शब्द शक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आढळतो.यावरून गोर स्त्रीयांचे प्रतिभा प्रांत आणि काव्य कल्पकता प्राचीनकाळी किती विकसित आणि प्रगल्भ होती याची आपणास कल्पना येते.
संदर्भ-
गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन
- भीमणीपुत्र
संपादन- प्रा.भारती अनिल मुडे
कोल्हापूर
.............
✍भीमणीपुत्र
मोहन गणुजी नायक
Comments