लेखक प्राध्यापक डॉ.प्रकाश राठोड हे परिवर्तनवादी विचारांचे लेखक आहेत .
त्यांची लेखणी गुलामगिरीचे पाश तोडून स्वतंत्र विचार करण्यासाठी माणसाला आधार देते . मार्गदर्शक ठरते .
त्यांनी लेखक आत्माराम राठोड यांना पाहिलेलं आहे . ऐकलेलं आहे . अनुभवलेलं आहे .वाचलेलं आहे .
महान क्रांतिकारक सेवालाल महाराज यांच्या 'जाणजो छाणजो पच मानजो 'या प्रखर बुद्धिवादी चिकित्सा दृष्टीला अर्पण केलेलं गोरबंजारा प्रकाशन तर्फे प्रकाशित तांडा विद्रोहाच्या विजांचा हा समीक्षा ग्रंथ त्यांची चौथी साहित्य कृती आहे .'तांडा विद्रोहाच्या विजांचा '
आत्माराम राठोड यांच्या स्वकथनाची प्रकाश राठोड यांनी केलेली बुद्धिवादी चिकित्सा .
वाचकांना आत्माराम राठोड यांच्या तांडा या स्वकथनाची ओळख करुन देतांना लेखक म्हणतो की ,षडयंत्रानेच तांड्याला हीन -दीन केले .शोषित केले . अंधश्रद्ध व धर्मांध केले . त्यामुळे तांडा पुजारी आणि पुढाऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या घशात गेला हे धडधडीत वास्तव अत्यंत जळजळीत शब्दात 'तांडा ' मधून प्रथमच अभिव्यक्त झाले आहे . म्हणून 'तांडा ' हे बहुचर्चित ऐतिहासिक व क्रांतिकारी स्वकथन ठरले .
लेखकाने शिकत असताना कॉलेजमध्ये 1992 मध्ये तांडा कार आत्माराम राठोड यांना प्रथमतः पाहिलं आणि त्यावेळेस ते भारावून गेले .कॉलेज कॅम्पस मधल्या आत्माराम राठोड यांच्या व्याख्यानाने लेखकाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वैचारिक शैलीचा सार्थ परिचय झाला .
आत्माराम कनीराम राठोड हे तांड्यातले व एकूण भटक्या विमुक्त जातीतले फार मोठे लेखक आहेत याची पहिल्यांदा जाणीव लेखकाला कॉलेजच्या कॅम्पस मध्ये झाली .
तांडा विद्रोहाच्या विजांचा या समीक्षा ग्रंथांमध्ये लेखकाने आपल्या प्रास्ताविकासह आंबेडकरी स्वकथने उदगम आणि वाटचाल आत्माराम कनीराम राठोड लौकिक आणि वांड्मयीन चरित्र , 'तांडा ' मधील समाजचित्रण .
प्रदेश विशेष ,लोक विशेष सामाजिक व धार्मिक जीवन संघर्ष ,आंबेडकरी स्व कथनातील तांडाचे निराळेपण आदी प्रकरणांचा समावेश असून आत्माराम कनीराम राठोड यांच्या स्वतंत्र ग्रंथसंपदेचा परिचय सुद्धा या समीक्षा ग्रंथामध्ये देण्यात आलेला आहे .
मराठीतील रुढआत्मचरित्रांच्या तुलनेत आंबेडकरवादी स्वकथनांचे निराळेपण व आंबेडकरवादी स्वखतनातील तांडाचे
निराळेपण यांचं विश्लेषण समर्पक पद्धतीने आणि चिकित्सकृतीने मांडलेलं आहे .
लेखकाने या समीक्षा ग्रंथाच्या माध्यमातून अनुभव सिद्ध लेखणीने तांडा वाचकांना समजून सांगितलेला आहे .
तांडा मधील सामाजिक ताण तांडातील स्त्री जीवनाचे स्वरुप आणि विशेष ,तांडा मधील व्यक्तिचित्रे याच बरोबर तांडा मधील भाषाशैलीवर भाष्य करताना लेखक म्हणतात की तांडाची भाषा ही साधी आहे .ही साधी प्रवाही भाषा वाचकाला भरकटू देत नाही .समीक्षाकार प्राध्यापक प्रकाश राठोड यांनी तांडा विद्रोहाच्या विजांचा हे या समीक्षा ग्रंथाचे नाव दिलेलं आहे ते समर्पक ठरते .
गोर बंजारा प्रकाशन कळमेश्वर यांनी प्रकाशित केलेला हा समीक्षा ग्रंथ वाचकांना 'तांडा 'ची खरी ओळख करून देण्यासाठी सार्थ ठरलेला आहे .
25 मे हा दिवस तांडाकार ' आत्माराम करीराम राठोड ' यांचा स्मृती दिवस आहे . गोर बंजारा साहित्य संघातर्फे हा दिवस 'गोरबंजारा साहित्य दिन 'म्हणून साजरा करण्यात येतोय ही आनंदाची गोष्ट आहे .
तांडाकार आत्माराम राठोड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि तांडा विद्रोहाच्या विजांचा हा समीक्षाग्रंथ आपल्या चिकित्सक लेखन शैलीने वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखक प्राध्यापक डॉ.प्रकाश राठोड यांच्या साहित्य लेखनाला हार्दिक शुभेच्छा .
'तांडा विद्रोहाच्या विजांचा '
आत्माराम राठोड यांच्या स्वकथनाची प्रकाश राठोड यांनी केलेली बुद्धिवादी चिकित्सा . वाचकांना आवडेलच यात शंका नाही .
--------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय लेखन
✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे
'गोरबंजारा साहित्य दिना'स हार्दिक शुभेच्छा...!