तांड्याचं संघर्षमय जगणं प्रभावीपणे मांडणारा कथासंग्रह -भरकाडी.
...........................................
मराठी साहित्यामध्ये 'भरकाडी' नावाचा कथासंग्रह डॉक्टर गणेश चव्हाण यांनी प्रकाशित केलेला आहे डॉक्टर गणेश चव्हाण हे संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा नागपूर या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचा भरकाडी हा कथासंग्रह यामध्ये एकूण नऊ कथा आहेत आणि दहावी कथा आहे ती बंजारा गोरबोलीभाषेत त्यांनी लिहिलेली आहे. या कथासंग्रहातील संपूर्णतः व्यक्तिरेखा आहेत या बंजारा तांड्याचं चित्रण दर्शवितात. बंजारा तांडा या कथासंग्रहाचे निमित्ताने मराठी
साहित्यात आला. तांड्यातला येडा आणि ती ,एक कळी कुस्करलेली,
ढोंगी देम्या,खेळ भातुकलीचा, लग्न एक जुगार, वनाई, उलंगलेली जीवनवाडी,जगण्याने छळले होते.या मराठी कथा आणि त्यासोबत भरकाडी या कथेचं गोरबोली भाषेत लेखन केले आहे.या कथासंग्रहात मराठी , व-हाडी बोली गोरबोली आणि हिंदीतले संवाद हे कथेत रस वाढवतात वाचकांना खिळवून ठेवण्याची क्षमता या कथांमध्ये आहे .या कथासंग्रह मध्ये वेदना आहे,कारुण्य आहे, विरह आहे, प्रेम आहे मैत्री आहे , नाट्य आहे त्याच सोबत वाद आहेत यश आहे न्याय-निवाडा संघर्ष रोजगारासाठी भटकंती त्याच्यासोबत सरकारचे धोरण, पुतळे उभारण्यासाठी सरकार तर्फे हेणारा खर्च आणि शेतकऱ्यांच्या व्यथा.शेतकऱ्यांच्या मालाला भाव आला की लगेच महागाई वाढते , वृत्तपत्रांमध्ये त्याची दखल घेतली जाते, कृषी मंत्रालय शेतकऱ्याची व्यथा समजून घेऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांचा विषयावर कसे राजकारण चालू आहे हे स्पष्टपणे मांडण्याचा,'तळागाळाचा,या मातीचा' विचार करण्याचे सामर्थ्य या कथासंग्रहात आहे.
लेखक प्रा.डॉक्टर गणेश चव्हाण यांनी कथासंग्रहाच्या माध्यमातून विविध बंजारा तांडे आणि त्यात जगणारे लोकं, कथानायक म्हणून आलेला बंजारा माणूस याठिकाणी उभा केलेला आहे .व्यंकटेश , संयोगिता आणि नरेश हे पात्र असतील त्यासोबत तोळा नावाच्या माणसाची होणारी परवड ,सासर आणि माहेर दोन्ही बाजू सांभाळत होणारा आघात मन सुन्न करुन जातो.चिटुरवाला त्याचं परीवरचं प्रेम, शिक्षण संस्था चालकाने गळ घातलेली पोरगी, नोकरीसाठी होणारी तडजोड व त्यातून जीवन भरकाडी जमिनी सारखे कसे असते हा संघर्ष मनाला चटका लावून जातो.
वडांगळी व पोहरादेवी हे दोन्ही बंजारा समाजाची धार्मिक स्थळे या निमित्ताने या कथेचे आलीत.या कथासंग्रहात मांडवा तांडा,गोविंदपूर तांडा,आणि जुनपाणी तांडा हे बंजारा तांडे प्रामुख्याने दिसून येतात.मामा आणि बंडू यांची जोडी आणि तर्री खायची रस्सा खायची ही गोष्ट या कथासंग्रहातून वाचतांना वास्तवतेकडे नेते.त्यासोबत बंजारा समाजातील अनिष्ट हुंडा पद्धत आणि बापाचं कर्जबाजारीपणा या विषयावर भाष्य करते ,नक्षलवादी भागात होणारी मुलाची पोस्टींग व त्या भीतीपोटी रात्रभर चिंतेत राहणारे त्याचे आई वडील,आदिवासी शिक्षणाची व्यथा व ती सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्याचे हाल व यातून त्याची आपल्या तांड्याकडे परतण्याची तयारी, तसेच उच्चशिक्षित माणसाची सुद्धा कशी परवड होते, हे 'तोळा' च्या व्यक्ती रेखेतून दिसते.तांड्याचं दु:ख मांडताना येथिल आरोग्य सेवा कशी आहे हे सांगताना लेखकाचे कौशल्य दिसते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा, तांड्यात शिरकाव करणारी सावकारी पद्धत, देम्याचा आळशी स्वभाव व त्यातून निर्माण होणाऱ्या घटना सोबत सरोजचं स्त्री सौंदर्य वर्णन लेखकाने अप्रतिम रेखाटले त्याचसोबत व्यंकटेश च्या चिठ्ठी ची गंमत,मनाची घालमेल अचुक टिपलेली दिसते.बदनामी च्या भितीने त्रस्त झालेली आई सामाजिक व्यवस्थेची स्थिती दाखविते. अवैध होणाऱ्या जंगलतोडीमुळे होणाऱ्या घोटाळ्यावर कथासंग्रह प्रकाश टाकतो.सदर कथासंग्रहास बंजारा साहित्यिक भिमणीपुत्र मोहन नाईक यांची प्रस्तावना लाभली आहे. नागपूर च्या 'राघव'प्रकाशन मार्फत अप्रतिमपणे कथासंग्रहाची मांडणी करण्यात आली आहे. उज्वल क्रिएशनने मुखपृष्ठ सुंदर केले आहे.
.......................................
✍पुस्तक परिचय लेखन
एकनाथ गोफणे.
8275725423
Comments