पुस्तक परिचय :-
तांड्यातल्या तात्यारावच्या आयुष्याच्या संघर्षाची आत्मकथा : -
संघर्षाचं सोनं
----------------------
शाळेसाठी नवी पुस्तके व लेखनसाहित्याचा हट्ट वडीलांकडे केला . वडीलांच्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबण्याची आलेली वेळ . अहिरे गुरुजींसह आईने शिक्षणासाठी दिलेला धीर . शिक्षणातील अडथळे दूर करत , धडपडत शिकून प्राथमिक शिक्षक पदावर उत्कृष्ठ कार्य करुन इतरांना प्रेरणादायी ठरणाऱ्या तांड्यातल्या तात्यारावच्या आयुष्याच्या संघर्षाची आत्मकथा म्हणजे 'संघर्षाचं सोनं ' हे आत्मकथन होय .
रजत प्रकाशन , छत्रपती संभाजी नगर तर्फे लेखक ,कवी तात्याराव चव्हाण यांनी लिहिलेल्या 'संघर्षाचं सोनं ' या आत्मकथनाची प्रथमावृत्ती ३ जुलै २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली .
विशेष म्हणजे या पुस्तकाची निर्मिती मुंबई येथे २०१८ मध्ये झालेल्या ५ व्या अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलनातून झाली असं म्हणावं लागेल .या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भीमणीपुत्र मोहन नाईक यांनी लेखकाला आपले कष्ट व्यथा विचार आणि कार्य परिस्थितीबद्दल लिहिण्याची प्रेरणा दिली . त्यानंतर लेखकाने पंजाबराव चव्हाण यांच्या ' याडी ' आत्मकथनाचे वाचन केल्यावर स्वतःही आपले अनुभव लिहावे या स्वयंप्रेरणेने 'संघर्षाचं सोनं ' लिहून पूर्ण झालं .एकूण 21 विविध आणखी आठवणींची मांडणी लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून केलेली आहे .
या पुस्तकाच्या माध्यमातून तत्कालीन बंजारा समाजाची आर्थिक व सामाजिक स्थिती वाचकांसमोर येते . आई मठाबाई आणि वडील धोंडुभिया यांच्या संसारिक धडपडीची ही कहाणी वाचकांसमोर व्यथांचं चित्रण करते . प्रामाणिकता व वस्तुनिष्ठ लेखन हा या आत्मकथनाचा गुण वाचकांना गुंतवून ठेवणारा आहे .
लेखकाच्या जडणघडणीत त्यांना प्राथमिक शाळेपासून ते डीएड या व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचा फार मोठा सहभाग आहे . नाती गोती सांभाळत , आठवणी जपत ही आत्मकथा एका यशस्वी जीवनाकडे घेऊन जाते . वाचता वाचता मध्ये येणारे 'बंजारा बोलीभाषेतील संवाद ' आत्मकथनाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात . सुरती नानी ,गोविंदकाका , कुंडलीक मामा, मेहरुबापू , शामुभिया , डिगंबर पाटील , व शेतात मजुरी करणाऱ्या इतर महिला आणि आत्मकथनात उल्लेख करण्यात आलेले इतर नातेवाईक , मित्र व सहकारी यांनी केलेली मदत
लेखकाच्या जीवन जडणघडणीत कसा प्रभाव टाकला होता . हे या आत्मकथनातून वाचतांना समजते . खांडीतील रात्रीचा जीवघेणा प्रवास वर्णन वाचतांना वाचकांच्या अंगावर काटा उभा राहतो . डीएड झाल्यानंतर लेखक शिक्षक होतो आणि नोकरी निमित्ताने सोलेगाव या पहिल्या गावाला हजर होतो .नंतर पारुंडी तांडा ,ढोरकिन या ठिकाणी केलेले कार्य .
विद्यार्थी आणि समाजाच्या उन्नतीसाठीकार्य करत असताना लेखक स्वतःही घडत गेले आणि विद्यार्थ्यांनाही घडवत गेले आणि समाजाची उन्नती करत गेले तात्याराव चव्हाण यांनी मराठी साहित्यात संघर्षात सोनं हे आत्मकथन लिहून आपल्या आठवणींना उजाळा दिलेला आहेत सोबतच अनेकांना प्रेरणा देखील दिलेली आहे .
या आत्मकथनातून तांड्याचा ग्रामीण भाग , शहरी भाग आणि तत्कालीन परिस्थिती आणि आजची बदललेली स्थिती हे लेखकाने आपल्या लेखन कौशल्याने दाखवलं आहे .या आत्मकथनाला सुंदर अशी प्रस्तावना पूर्व शिक्षणाधिकारी तथा लेखक पोपट काळे यांनी दिलेली असून ,मराठवाडा साहित्य परिषद पैठण शाखेचे अध्यक्ष अनिल देशमुख आणि विठ्ठलराव फुलतांबकर यांनी अभिप्राय दिलेला आहे .अनिल जोशी यांनी आत्मकथनाची माहिती देणारे मुखपृष्ठ बनवलेलं आहे '
बंजारा तांड्यातल्या 'तात्यारावच्या आयुष्याच्या संघर्षाची आत्मकथा : संघर्षाचं सोनं ' ही साहित्यकृती अनेकविध पुरस्काराने सन्मानित होवो हीच हार्दिक शुभेच्छा🌹
✍️
एकनाथ लक्ष्मण गोफणे
8275725423
चाळीसगाव
Comments