पुस्तक परिचय :-
------
तांड्यामध्ये परिवर्तनाचा उजेड पेरणारा गोरबोली बंजारा भाषेतील काव्यसंग्रह - 'झावळ '
----------------------
कवि प्रा .अरुण पवार हे नाव मराठी साहित्यासह बंजारा गोरबोली भाषेत सकस व सृजनशील साहित्य निर्मित साठी प्रसिद्ध आहे . प्रचंड निरीक्षण क्षमतेच्या जोरावर समाजाच्या व्यथा मांडणारे कवी . प्रबोधन
मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या रचना वाचकांच्या मनाला भुरळ घालतात . प्रा .अरुण पवार यांचा गोरबोली बंजारा भाषेतील
'झावळ ' पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन २ एप्रिल 2024 रोजी नांदेड जिल्ह्यात सारखणी येथे करण्यात येत आहे .
दमाळ प्रकाशन चंद्रपूर यांनी प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहात एकूण 52 कविता आहेत .आशय सौंदर्याने नटलेला गोरबोली बंजारा भाषेतील हा काव्यसंग्रह आहे .
पहाटेच्या झुंजूमुंजू होण्याच्या वेळी आपल्या झोपडीच्या बाहेर दिव्याच्या मंद प्रकाशात जात्यावर आपल्या बोलीतील पारंपारिक गीत गात दळण दळणाऱ्या बंजारा स्त्रीच चित्रण असलेलं सुंदर असं मुखपृष्ठ विवेक राठोड यांनी तयार केलेलं आहे .
काव्यसंग्रहातील कविता तालबद्ध , लयबद्ध आहेत .सूचक , प्रेरक ,प्रबोधन करणाऱ्या , मार्गदर्शन व प्रेरणा देणाऱ्या कविता . 'स्व ' ची जाणीव निर्माण करतात .दुःख कारुण्य , माया 'ममता ,विरह , गौरव गाथा , बंजारा संस्कृती चालीरीती यांची माहिती देत त्यांच्यापासून दूर जाणाऱ्यांना समाज संस्कृतीच्या जवळ येण्याचा प्रेमाचा सल्ला देण्यासोबत , आत्मसन्मान जागृत करुन सामाजिक भान देणारा हा काव्यसंग्रह आहे .
'अंधारेम चेतरो छ
एकलोच दिवलो
आकीरमाई आसू
मुंडेरमाई ढावलो .
भलीकानी भराव ऊ
नेकी बदीर हाट
वजळेरतो गाठ पाडीय
झावळेर वाट ' .
सासुरवाशी मुलीच्या मनातील आठवणी ताज्या करणारी आईशी संवाद साधणारी तिची व्यथा 'ये या मन ' या कवितेत शब्दबद्ध करण्यात आली आहे .
'दवाळी ' या शिर्षकाच्या कवितेतून
बंजारा समाजाच्या जीवनाची व्यथा आणि परिस्थितीची जाणीव वाचकांना होते .
'झुपडीम ' या कवितेतून घरदार सोडून कामाच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या आईची आणि लेकरांची व्यथा मांडलेली आहे . विरह भाव दर्शविणारी ही रचना वाचतांना वाचकांचे डोळे पाणावल्या शिवाय राहणार नाही .
बंजारा समाजातील लेखक
तांडाकार आत्माराम राठोड यांच्यासोबत भीमणीपुत्र मोहन नाईक यांच्या साहित्य विषयक कार्याचा गौरव या काव्यसंग्रहातून करण्यात आलेला आहे .
निसर्गातील बदलाचे संकेत या काव्यसंग्रहात कवीने आपल्या अचूक निरीक्षणातून टिपलेले आहेत .
सामाजिक स्थितीमध्ये आपलीच माणसं आपला कसा घात करतात याचं वर्णन करतांना कवी म्हणतो ,
'झाडेरो फांदा झाडेती
खारो टाळो र
कराडीरो डांडो हेन
घात करेवाळो र ' ..
कवी प्राध्यापक अरुण पवार या काव्यसंग्रह मधून बंजारा समाजाच्या अस्मितेच , एकतेच दर्शन घडवितात सोबतच राजकीय सामाजिक चळवळीला मार्गदर्शनही करतात .संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करुन समाजाच्या सुधारणेसाठी परत येण्याचा हट्ट धरतात .
आई आणि वडील यांचे वर्णन 'याडी -बाप ' या कवितेत करताना कवी म्हणतो .
' याडी शीळगार छेंडी
बाप भडंग उंदाळो
सेरे लोई पाणीसारु
उतो मांडमेलो माळो '
गोरबोली शीर्षकाच्या कवितेतून या बोली भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी गरज व्यक्त करण्यात आली आहे .
'मोर्चा र लढाई ' या कवितेतून
सामाजिक चळवळीचे वास्तव मांडलेलं आहे .
'बापू सेवा भाया 'या शीर्षकाच्या कवितेतून संत सेवालाल महाराज यांचे पुरोगामी विचारांना कसं दूर सारुन स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कसा प्रयत्न केला जात आहे . याचा सवाल उपस्थित केला आहे .
'भरोसो करीया केरो ' ही कविता
बंजारा समाजाला वेगवेगळ्या मार्गाने नेऊन गुमराह करणाऱ्यांना
टोला लगावला आहे . या सोबत
सामाजिक परिवर्तनासाठी ही मत ठेवण्याचा सल्ला देताना कवी म्हणतो ,
'मत हारो रे हिंमत
खरे लोईन आये किंमत ' .
'ठाली गवली ' या कवितेतून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना , त्यांच्यासारखे दूरदृष्टीचे कार्य करणारे नेतृत्व या समाजात निर्माण झालं नाही ही खंत सुद्धा कवी व्यक्त करतो . गोरबोली बंजारा भाषेतील अनेक शब्द या काव्यसंग्रहामुळे साहित्यात उमटले .
' दनिया ' या कवितेतून 'स्व ' ची जाणीव .आत्मविश्वास निर्माण करण्याची प्रेरणा मिळते .प्रबोधन व परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करायला लावते . जग दुनिया बदलून जाईल तुम्ही मागे राहू नका . कोणत्याही भाषेचा द्वेष न करता देशी विदेशी भाषा शिका व परदेशात तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटबा असं उधार न सांगता कवी रोखठोक सांगतो .
'छमक्या घुगरावाळी ' कविता प्रेमभाव जागृत करते .
बंजारा संस्कृती बंजारांचा भूतकाळ वर्तमान स्थिती आणि भविष्याचा वेध घेणारा हा कवितासंग्रह रात्रीचा भयाण अंधार संपत आला असून झुंजूमुंजू झाल्यावर प्रकाशाशी गाठ पडणार आहे . असा आशावाद निर्माण करतो .
नभांगणातील मृगाचे तीन तारे पाहून कवी म्हणतो ,
' हाण्णीर तीन तारा
आतमते जारेते
पफोळी फाटतूवणा
पकेरु गारे ते
कती बती ढगेन
भेबरो लागरोतो
हाणी हाणी तांडेम
वजाळो पांगरोतो . '
आपल्या शब्दातून बंजारा तांड्यामध्ये परिवर्तनाचा उजेड पेरणारा गोरबोली बंजारा भाषेतील हा काव्यसंग्रह प्रकाशित करून कवी .प्रा . अरुण पवार यांनी गोरबोली साहित्य क्षेत्रात दमदार पदार्पण केला आहे .
कविता वाचनासोबत कवीच्या सुमधुर आवाजातून ऐकताना पण खूप मजा येते . त्यांच्या या साहित्य निर्मितीला हार्दिक शुभेच्छा🌹
---------------
✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे
8275725423
Comments