पुस्तक परिचय .
-----------
नातीने शब्दबद्ध केलेली आजोबांच्या आठवणींची
चरित्र कथा - 'आबा माणसातला देवमाणूस ' .
----------------------
आजी आजोबा व नातवंड यांच्या हास्यकल्लोळ , गप्पा संवादाने क्षणोक्षणी आनंदात रमणारे घर स्वतःला समृद्ध व भाग्यवान समजत असेल . निरागसता व निखळ आनंद या बाल व जेष्ठ नात्याचा आनंददायी धागा असतो . आजोबा नातवंडांमध्ये आपलं बालपण न्याहळत असतात . ही नातवंड मोठी झाल्यावर आजोबांच्या आठवणीत रममाण होतात .
आजोबांची अशीच मनात घर करुन राहिलेली आठवण
नातीने शब्दबद्ध केलेली आहे
चरित्र कथा स्वरुपात 'आबा माणसातला देवमाणूस ' या पुस्तकाद्वारे .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कजगाव ता . भडगाव या ठिकाणी कार्यरत असलेल्या सौ . दिपाली देशमुख वाबळे या प्राथमिक शिक्षिका असलेल्या लेखिकेने लिहिलेल्या या आठवणी 'अथर्व पब्लिकेशन -जळगाव ' यांनी पुस्तक रुपाने प्रकाशित केलेले आहेत
एकूण 20 भागांमध्ये असलेल्या या पुस्तकाचा प्रारंभ , लेखीकेचे आजोबा चहा पीत असतांना 'सूर्याने सुट्टी घेतलीय का कधी ? मग तुम्हालाच बरी सुट्टी हवी , उठा आता ' .
असा शिस्तीचा सल्ला देत आळस झटकून कामाला लागायचे सांगण्याचा सल्ला देण्याने होतो .
या पुस्तकातले आजोबा हे व्यक्तीमत्व प्रेमळ शांत स्वभावाचे ,टोपीवाले बाबा भाऊराव आबा , मळ्यातले बाबा या नावाने वाचकांसमोर येतात .
लेखिकेच्या व्यक्तीचित्रण खूप सुंदर पद्धतीने केलेले आहे .
30 ,40 जणांचे एकत्रित कुटुंब आणि त्या कुटुंबातले हे शिस्तप्रिय आजोबा त्यांचा पहाटे चार वाजल्यापासून सुरु होणारा दिनक्रम .
शांत सरळ स्वभाव ,पण इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध सवंगड्यां समवेत बारा वर्षाच्या असताना केलेली जाळपोळ एवढाच संताप असलेलं हे व्यक्तीमत्व .
या पुस्तकातून एकत्रित कुटुंब पद्धतीतील सुखावर भाष्य करण्यात आलेलं आहे .
त्या काळात आबांसाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम व निमित्ताने बैलगाडी वरील वऱ्हाड , मार्गातील जाळीचा देव हे धार्मिक स्थळ , लग्न स्थळाची तयारी , कलावती व भाऊराव यांच्या लग्नगाठी बांधण्याचा प्रसंग व शेंदुर्णी गावाच्या आठवणी या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत .
शेतशिवारातील कामे , कौटूंबिक जबाबदारी व जिव्हाळा जपत हळूहळू संसारात होणारी प्रगती व आबा या व्यक्तीमत्वाचे कौटूंबिक व सामाजिक कार्याचा इत्यंभूत आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे .पुस्तकातून मानवी नातेसंबंधांसोबतच प्राण्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध सुद्धा मानवतावादी दृष्टिकोनाचा नवा विचार मांडून जातात . पोळा सणाच्या आठवणीचा प्रसंग लेखिकेने सुंदर रितीने मांडला आहे . 'शेंदुर्णी परिसरातील 'तावडी ' भाषेची आपुलकी व माधुर्य या पुस्तकातून दाखविण्याचा लेखिकेचा प्रयत्न बोली भाषेचे महत्व अधोरेखित करतो .श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी . हे सांगतांना सामाजिक मूल्य जपत वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात निर्माण व्हावा यासाठी , छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी आपल्या लढाया अमावस्येच्या रात्री लढल्या व जिंकल्या आणि स्वराज्य निर्माण केले . आबांचे कृतीशिल उदाहरण साहित्यमूल्य जपते .
शेंदूर्णी गावाचे ऐतिहासिक , धार्मिक , राजकिय ,सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मता जपणारे गाव हे महत्व या पुस्तकात आठवणीच्या रुपात जपून माहेरचं महत्व लेखिकेने विषद केले आहे . हे सांगतांना लेखिका दिवाळीच्या सुट्टीत येणाऱ्या पौणिमेला भरणाऱ्या शेंदूर्णीच्या यात्रेत फिरवून आणते . भुलाबाईची गाणी व आठवणी सांगते .
त्या काळात आजोबांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य भिक्षुक व त्यांच्या संवादातून सविस्तर मांडून सामाजिक प्रबोधनाचे अनमोल कार्य पुस्तकातून सांगितले आहे .
एकूण वीस भागातील या पुस्तकातून भाऊराव भिकनराव देशमुख यांची नात असलेली लेखिका दिपाली देशमुख यांनी आपल्या आजोबांच्या आठवणी पुस्तक रुपात आणून मराठी साहित्य क्षेत्रात प्रथम पाऊल टाकलेलं आहे .नातीने शब्दबद्ध केलेली आजोबांच्या आठवणींची
चरित्र कथा - 'आबा माणसातला देवमाणूस ' . या पुस्तकाच्या लेखना निमित्त
लेखिकेच्या या प्रयत्नाला हार्दिक शुभेच्छा .🌹🌹🌹🌹
.----------------------
✍️एकनाथ लक्ष्मण गोफणे .
8275725423
चाळीसगाव
تعليقات