पशु पातळीवर तांडा जीवन जगणाऱ्या गोरमाटी/बणजारा गण समाजातील आत्माराम कनिराम राठोड लिखित 'तांडा'ने मराठी आत्मकथनाच्या दालनात सर्व प्रथम दमदार पाऊल टाकले.यानंतर 'आलेख समाज प्रगतीचा'-बळीराम पाटील, 'तांडेल'- रावजी राठोड, 'याडी' -पंजाब चव्हाण,'सिटी ऑफ मांडवी'- उमा राठोड,'टाबरो'-शिवाजी राठोड, 'लदेणी'- नामदेव चव्हाण,'वादळवाट'- नामदेव राठोड,'अंधार यात्रीचे स्वप्न'- राजाराम जाधव,'कडापो'- रतन आडे,'आठवणीचं गाठोडं'- मोतीराम राठोड,आणि शिवाजी जाधव - 'आयुष्य जगताना' अशी एकामागून एक सरस आत्मकथनाची निर्मिती करून प्रतिभावंत गोरमाटी लेखकांनी आपल्या कसदार लेखणीने मराठी भाषेतील आत्मकथनाचे साहित्य शिवार फुलविले यात पुन्हा डॉ.वसंत भाऊराव राठोड लिखित 'कल्लोळ'या आत्मकथनाची मोलाची भर पडली.
डॉ.वसंत भाऊराव राठोड यांचे 'कल्लोळ'हे आत्मकथन मराठी साहित्यातील उणीव भरून काढणारे एक समृद्ध आणि लक्षणीय असल्याची पावती माजी कुलगुरू तथा अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले सरांनी दिलेली आहे.
डॉ.वसंत भाऊराव राठोड हे नाव मराठी साहित्य वर्तुळात नवखे राहिलेले नाहीत.मराठी सारस्वतातील एक एक संवेदनशील साहित्यिक आणि विचारवंत म्हणून सर्वांना परिचित असलेले हे नाव आहे.'जाग पालका आणि जगणे रानफुलांचे'हे वैचारिक ग्रंथही त्यांनी लिहिलेले आहेत.अ.भा.मराठी साहित्य संमेलनातील चर्चा सत्रात अनेकवेळा त्यांनी सन्मानपूर्वक सहभाग नोंदविला आहे.'बेकारी,स्वच्छता,व्यसनाधीनता,सामाजिक व शैक्षणिक विषयावरील ५२५ पेक्षा अधिक व्याख्याने आणि बॅ़काॅंक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातील त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे.
घरची परिस्थिती अत्यंत बिकट आणि हालाकीची असतानाही परिस्थितीवर मात करून 'मला मरायचे नाही,जागायचे आहे आणि काही तरी करून दाखवायचे आहे'असा निर्धार करणाऱ्या ध्येय वेड्या तरूणाची संघर्षमय यशोगाथा म्हणजे हा 'कल्लोळ'होय.आपल्या स्वकथनाला लेखकाने दिलेले 'कल्लोळ'हे नाव समर्पक आणि अर्थपूर्ण ठरते.या स्वकथनात 'गोरमाटी,गोंडी,मराठी,हिंदी' भाषिक व्यक्तिरेखाही एकूण समाज जीवनासह आपणास भेटतात.त्यामुळेच हे स्वकथन सामाजिक,सांस्कृतिक दस्तऐवज ठरावे येवढी उंची या कल्लोळ आत्मकथनाने गाठलेली आहे.
स्वता:चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी लेखकाला भोगाव्या लागणाऱ्या यातना,उपसावे लागणारे कष्ट आणि गरीबी श्रीमंती या विषमतावादी समाज व्यवस्थेच्या आगीत होरपळलेल्या कुटुंबाची ह्रदयद्रावक कर्म कहाणी निश्चितच काळजाला खेटून जाणारी अशीच आहे.यात एकूण १२ प्रकरणे असून सर्वच प्रकरणे अभिव्यक्ती आणि आशय सौंदर्याने ठसठशीत वाटतात.
'या' आणि 'बा' यांच्या प्रमाणेच लेखकाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली या आत्मकथनातील लक्षवेधक व्यक्तीरेखा म्हणजे लेखकाची पणजी गुजरी नायकीण.पणजी गुजरी नायकीण आणि लेखकातील संवादाचा जीवंत झऱ्यामुळेच ह्या आत्मकथनाच्या सौदर्यात मोलाची भर पडलेली जाणवते. जीवनाचा चौथा प्रहर गाठलेल्या आत्माभिमानी पणजीची करूण कहाणी चित्रित करताना लेखकाने पणजीच्या तोंडी घातलेली अलंकारिक भाषा शैली अंतर्मुख करणारी असून विषयानुरूप भाषा शैली,नादमधुरता आणि शब्दाचे लालित्य लेखकाच्या लेखणीने सहज साधलेला आहे.
गुजरी नायकीणच्या गतकालीन जीवनाच्या सुखवस्तू घराण्यातील आठवणी शब्दबद्ध करताना लेखकाने पणजी गुजरी नायकीणच्या तोंडी घातलेल्या भाषा शैलीने अतिशयोक्ती अलंकार साधलेला आहे."मसाला वाटून खलबत्त्याचा खैराचा सोटा दीड दोन वर्षातच हातभर होऊन बसला-येवढे लाकूड आणि दगडाचे कण आम्ही मसाल्या सोबत फस्त केला नि पचवला"
गोरखनाथाची भविष्यवाणी ऐकून लेखकाला पणजी गुजरी नायकीण सोबत शिक्षणासाठी आंदबोरीला पाठविण्याचा धाडसी निर्णय 'या'आणि 'बा'घेतात.
"या आणि बा ची जगण्याची वाताहत चालूच होती,सालगड्याचं जगणं 'बा'च्या नशीबी आलेल होतं ते भोग 'बा'भोगत होता.माझ्याकरिता ज्ञान व आजीसाठी आधार माझ्यात 'बा'शोधत होता".
"मी ज्ञानाच्या शब्दगंधासाठी आंदबोरीच्या वाटेला लागलो होतो.ज्ञानाचा वाटसरू म्हणून आजीसंग दुडूदुडू (नादमय) चालू लागलो".
"आंदबोरीला आल्यानंतर गुजरी नायकीणच्या नशिबी शेळ्यांचा गोठाच यावा किती मोठा दैवदुर्विलास होता तिच्या दुर्भाग्याचा.तिचे संघर्षमय जगणच बद्धू नायकाच्या खानदानीला उभारी देत होतं".
अभिव्यक्तीसाठी लेखकाने वापरलेल्या भाषिक सौंदर्यामुळेच या आत्मथनाला वेगळीच धाटणी आणि स्वरूप प्राप्त झालेले आहे.
लेखकाच्या व्यक्त होण्याच्या शैलीत घडलेल्या घटनांचे चित्र डोळ्यापुढे उभे करण्याचे विलक्षण सामर्थ्य निश्चितच आहे.
या आत्मकथनातील एका ह्रदयद्रावक पदराचाही उल्लेख करणे हे या ठिकाणी महत्त्वाचे ठरेल. लेखक दुसऱ्या वर्गात शिकत असताना लेखकाचे वडील भंग्या आंधची शेती बटाईने करतात.वडील कामासाठी बाहेरगावी गेलेले असताना भंग्या आंधची गायी बैलं चारण्याची पाळी लेखकावर येते.बैल चारत असताना लेखकाच्या पायात काटा रूतल्याने पायातून भळभळ रक्त सांडते.पायातील काटा काढताना गायी बैल उभ्या पिकात शिरतात.तेवढ्यात भंग्या आंध येउन लेखकाच्या कानसूळीत लगावतो.
तेवढ्यात लेखकाची आई येते."का रडत आहेस तू? कुणी मारलं तुला?
"याडी मन भांग्या मामा मारो".
आपल्या लेकऱ्याच्या गालावरचे वळ पाहून याडी गहिवरते.. "दादा लहान लेकरू हाय,असं मारायचे असतं व्हय?"
असं म्हणत याडी रडायला लागते.स्त्री जन्माचा भोगवटा नशिबी आलेल्या याडीला दु:ख हलके करण्यासाठी रडण्याचा हाच एक मार्ग मोकळा असतो..रडण्या शिवाय ती दुसरे काहीच करू शकत नाही.
लेखकाच्या ह्रदयात साठवलेल्या बालपणाच्या आठवणी उजागर करताना लेखक सांगतो "याडी माझ्या पायातील काटा काढत असताना मी रडत होतो तर दुसरीकडे तिच्या मातृत्वाचे वात्सल्य रडत होते"
शिक्षणासाठी औरंगाबादला जाण्यासाठी आईला पैसे मागताना लेखकाला आलेल्या अनुभूतीचे चित्रण उभे करताना लेखक म्हणतो 'दारिद्र्याच्या लक्तराची कल्लोळ कोथळी याडीने माझ्यापुढे सोडली होती" दारिद्र्याचे चटके शोषणाऱ्या लेखकाची ही लालित्यप्रचूर भाषाशैली सरळ काळजाला भिडणारी आहे.
आपल्या यशाच गुपित "बा" च्या घामात आणि "याडी" च्या आसवात शोधताना लेखकाने आपले बलस्थान असलेल्या आपली "याडी भाषा"आणि "धाटी"लाही आपल्या सोबत घेतलेले आहे हेच या कलाकृतीचे नजरेत न मावणारे देखणे रूप आहे.
वाङ्मयीन गोर धाटीतील स्त्रीयांचे रडणे हे गीतासह असते ह्या अनोख्या गोर जीवनशैलीची ओळखही लेखकाने आपल्या जीवन पटाची पाने उघडताना जगापुढे ठेवली आहे याचा मी या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो.उद:- मळणो (रडण्याची एक पद्धत)
*याडीये...*
*कुणसे खोळामं मनं नाकी..*
*हारदं करू तो तारी मुरत दकायेनी याडीये.. हिंया..!*
गोरमाटी बोलीभाषा आविष्कार शुन्य होत चाललेली असताना गोरमाटी बोलीभाषेतील 'गुंबडी,आल्डाणो,डील,डोकरी,झाकट,बाटी,होरका,तांगडी, छादळा,आटी,चोटला'या सारख्या भाषा व्यवहारातून हद्दपार होत असलेल्या शब्दांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून लेखकाने गोरमाटी बोलीभाषेतील शब्दांची स्वतंत्र प्रतिमा आणि मुद्रेचा शोध घेऊ पाहणाऱ्या अभ्यासकांसाठी एक खुले दालन उभे केलेले आहे.
भाषांचा तौलनिक अभ्यास करणाऱ्या भाषावैज्ञानिकांना या आत्मथनाचे मोल फार मोठं असणार आहे,कारण जाणकार विज्ञापक हल्ली तांड्यात सापडणे कठीण आहे.
गोरमाटी बोलीभाषेतील हे शब्द गोरमाटी बोलीभाषेचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणारे असून मराठी भाषेचे वैभव वाढविणारे आहे.ही या आत्मथनाची एक जमेची बाजू आहे.
कसलाही आडपडदा न ठेवता अगदी मोकळेपणाने आपला जीवनपट शब्दात बंदिस्त करून लेखकाने आपल्यापुढे ठेवलेला आहे यात कुठेच कृत्रिमरीता वाटत नाही.
प्रगतीची वाट उध्वस्त झालेली असली तरी जिद्द आणि कष्टाच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते हाच मौलिक संदेश लेखकाने या प्रस्तुत आत्मकथनातून दिलेला आहे..!
एकंदरीत "कल्लोळ" हे वाङ्मयीन मूल्याच्या कसोटीला पुरेपूर उतरणारे असून वाचनीय आहे यात तिळमात्र शंका नाही.
लेखकाच्या पुढच्या स्वप्नास शुभेच्छा...!!
(आत्मकथनाचे सौंदर्य खुलविणाऱ्या केणावट,वाक्प्रचाराचे विस्तार भयामुळे मूल्यमापन करण्याचे मी मुद्दाम टाळलेले आहे)
डॉ.वसंत भाऊराव राठोड
भ्रमण ध्वनी- 9420315409*
मूल्य- 400 रू.
प्रकाशक - के.एस.अतकरे
कैलास पब्लिकेशन्स
औरगपुरा,औरंगाबाद
समिक्षा लेखन-----✍
भीमणीपुत्र
मोहन गणुजी नायक
Comentarios