top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

पुस्तक परिचय -शिकण्याच्या जिद्दीने संघर्ष करणाऱ्या तांड्यातल्या यशस्वी तरुणाची कहाणी - अजिंक्यवीर

पुस्तक परिचय -


शिकण्याच्या जिद्दीने संघर्ष करणाऱ्या तांड्यातल्या यशस्वी तरुणाची कहाणी - अजिंक्यवीर ...

--------------------------------------------------------



परीक्षेची फी भरण्यासाठी चाळीस रुपये व्याजाने देताना लेखकाच्या शरीरयष्टी कडे पाहून 'याला का शिकवता , त्यापेक्षा माझ्याकडे किंवा कोणाकडेही कामाला ठेवा ' . ही टिंगल टवाळीची भाषा ऐकून वडीलांचे अथक परिश्रम व स्वतः शिकण्याची जिद्द व संघर्ष करत महाराष्ट्र शासनात

सहसचिव पदाचा पदभार सांभाळणाऱ्या भटक्या विमुक्त समुहातील बंजारा तांड्यातल्या तरुणाची यशस्वी कहाणी म्हणून 'अजिंक्यवीर ' हे आत्मकथन वाचतांना ; शिक्षणाच्या सुविधेमुळे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या समान संधीमुळे या संधीचं संघर्षातून सोनं करत आपल्या यशस्वी जीवनाला इतरांसाठी प्रेरणादायी करण्याची कथा पुस्तक रुपात प्रकाशित करुन महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त सहसचिव लेखक ,कवी राजाराम जाधव यांनी मराठी साहित्यात 'आत्मकथन ' या साहित्य प्रकारात अपूर्व असं योगदान दिलेल आहे .

राज्य शासनात विविध पदावर कार्यरत असलेल्या राजाराम जाधव यांनी 'वादळवारा ' या काव्यसंग्रहासह

'वाळवंटातील संधीप्रकाश ' हा ग्रामीण लघुकथा संग्रह , 'अंधार यात्रीचे स्वप्न ' हे चरित्र आणि अजिंक्य वीर हे आत्मकथन ही साहित्य संपदा प्रकाशित केली असून 30 नोव्हेंबर २० २३ रोजी त्यांची 'चंद्रकला ' ही कादंबरी यवतमाळ येथे प्रकाशित करण्यात आली आहे.


'अजिंक्यवीर ' या आत्मकथनाची प्रस्तावना महाराष्ट्र शासनाचे माजी माहिती जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिली आहे . तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव ज. स . सहारीया यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे.


या आत्मकथनात पार्श्वभूमी , बालपण शिक्षण यासह लेखकाने शासनाच्या ग्रामविकास ,सामान्य प्रशासन , विमान चालन संचालनालय , वित्त विभाग , या विविध विभागात केलेल्या कार्याची छायाचित्रासह आठवणी वाचता येतात . बालपण शिक्षण या भागातील लेखन तांड्यातील लोकजिवन , आर्थिक व सामाजिक तत्कालिन स्थितीच दर्शन घडवितात . १९७२ - ७३ चा दुष्काळ , कुटूंबाला आधार म्हणून लेखकाचे हॉटेल मधील रोजंदारीचे काम . यवतमाळ कामाला जाण्यासाठी गावाच्या बस स्टॉपवर थांबलेली पुसद ते यवतमाळ बस व आईच्या डोळ्यात सुरु झालेल्या अश्रुधारा . लेखकाच्या मनाची हुरहूर , बसच्या मागील काचेच्या खिडकीतून निरोप देणारे आईबाबा . हे शब्द चित्रण प्रसंग आत्मकथनाला बळ देतात . बी .डी राठोड नावाचे एस .टी . कर्मचारी हे कसे देवदूत ठरले. याचं वर्णन अप्रतिम आहे.

लेखकाचा दहावी ,बारावी ,पदवी पर्यंतचा प्रवास या आत्मकथनाची जमेची बाजू आहे . लेखकाच्या जीवनात फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे योगदान महत्वपूर्ण आहे.

हरिसिंग साबळे सरांची लेखकाला असलेली प्रेरणा कशी मोलाची ठरली याचे वर्णन आत्मकथनात आहे . महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या परीक्षेत लेखक उत्तीर्ण होतो. २० फेब्रुवारी १९८४ पासून शासनाच्या ग्रामविकास विभागात रुजू होऊन लेखक शासनाच्या ग्रामविकास ,सामान्य प्रशासन , विमान चालन संचालनालय , वित्त विभाग , या विविध विभागात सेवा करतो . अशी ही शिकण्याच्या जिद्दीने संघर्ष करणाऱ्या तांड्यातल्या तरुणाची कहाणी - अजिंक्यवीर या आत्मकथनात

शब्दबद्ध करण्यात आली आहे. 'भरारी प्रकाशन ' - मुंबई यांनी हे आत्मकथन प्रकाशित केले असून डौलाने फडकणारा तिरंगा सोबतच राजमुद्रा व 'तांड्यातील झोपडी ते मंत्रालय व लेखक जाधव यांचे यशस्वी जीवनाचे स्मित हास्य ' असे सुंदर मुखपृष्ठ

सुहास भागवत यांनी तयार केले आहे. ज्यातून जिद्दीने संघर्ष करणाऱ्या तांड्यातल्या तरुणाची कहाणी - अजिंक्यवीर खुलून दिसते . विविधांगी साहित्यकृती निर्माण करुन मराठी साहित्यात लेखक राजाराम जाधव यांनी योगदान दिले आहे . याच प्रमाणे बंजारा गोरबोली भाषेतही त्यांनी प्रेरणादायी कथासंग्रह, कवितासंग्रह प्रकाशित करावे यासाठी हार्दिक शुभेच्छा🌹

--------------------

✍️ पुस्तक परिचय लेखन : -

एकनाथ लक्ष्मण गोफणे .


📲 8275725423

चाळीसगाव

44 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page