तडवी बोलीचा अनमोल ठेवा कथासंग्रह 'रानमेवा'.
रानमेवा हा कथासंग्रहात संवेदनशील आणि सामाजिक जाण असलेले लेखन रमजान तडवी यांच्या लेखनात दिसून येतं.
या कथासंग्रह मध्ये एकूण अकरा कथा आहेत. तडवी बोलीत लिहिलेल्या कथांचा मराठी अनुवाद सुद्धा दिलेला आहे. कुदरत , मुक्ती हसनुर भाभी, पहिली भेट, कुटुंब नियोजन, ताटातूट ,कंदाची पंगत , पाहुणचाराची वाट, पिठाया चांगला, फरिस्ता अनं कहानीकार, मुक्काम या कथा सदर संग्रहात आहेत. तडवी बोलीभाषा आदिवासी भिल्ल समाजाची बोलीभाषा आहे.संमिश्र जीवन पद्धती जगण्याच्या त्यांच्या कृतीबद्दल लेखक म्हणतो , 'आदिवासी तडवी भिल्ल हे मिलीजुली रहेनी पायतं हती', बोलीतील कथा , शेती ,माती, शेतमजुरी या मुख्य बिंदूपासून सुरु होतात.
कुदरत या कथेतून निसर्गचक्र ही सगळी घटना त्यांनी यामध्ये मांडलेली आहे मजुराच्या मनाची दोलायमान स्थिती या कथेमध्ये दिसून येते.
'पेरणा, उंगणा, संभालना, कमावणा, खाना, जगणा अनं आदिक पेरणा या जिंदगीची चक्रात अख्खा गाव गुतायेल होता'.
निसर्गातून, गावाच्या मातीतून पुढे आलेलं एक व्यक्तिमत्त्व. अनेक प्रकारच्या हाल-अपेष्टा सहन करुन. शिक्षण घेऊन विविध भाषांशी, विविध परिसराशी महाराष्ट्राच्या विविध भागात प्रशासकीय विभागांमध्ये नोकरी करत असताना वेगवेगळ्या भाषांची व बोली मध्ये राहून सुद्धा रमजान भाऊ आपली मूळ बोली भाषा तडवी बोली विसरले नाही. तर तिला समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहिले आणि त्यांच्या या प्रयत्नांचाच भाग बोलीला समृद्ध करण्यासाठी त्यांनी केलेलं हे अतुलनीय कार्य त्यांच्या रानमेवा या कथासंग्रहातून आपल्याला दिसून येते.कथांमध्ये त्यांचा परिसर आलेला आहे. जगण्याची वास्तवता. स्त्रियांच्या व्यथा, बालकांच्या व्यथा कथा आणि भविष्यात त्यांच्या साठी काय करायचं या सगळ्या गोष्टी वाचकांना खिळवून ठेवतात. रमजान तडवी यांच्या लेखनामध्ये सामाजिक जाणीव दिसते संवेदनशीलता दिसते. त्यांच्या अनेकविध कथा या आपल्या परिसराला उभं करत असतात .
या कथेच्या माध्यमातून सातपुड्याचा परिसर दिसतो. आहे त्या जंगलाचा भाग तिथला सगळा परिसर तिचं जगणं जगण्यातली वास्तवता. इथलं लोकजीवन राहणीमान तिथल्या तिन्ही ऋतूतील मधली स्थिती हे या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे.
रमजान तडवी यांची प्रत्येक कथा ही निसर्गाशी तादात्म्य पावते . उकाड्याने हैराण झालेली गावकऱ्यांची व्यथा असो मजुरांची कथा असो हे सगळेच त्यांच्या कथेमध्ये येतात .चिकित्सक पद्धतीने अगदी बारीक-सारीक घटना जशाच्या मांडलेल्या आहेत. जे अनुभवले ते शब्दबद्ध केले.
कथा हा साहित्याचा एक प्रकार लेखकाने उत्तम प्रकारे मांडलेला आहे. . आशय-अभिव्यक्तीची अनेकविधता ह्यांनी रमजान तडवी यांच्या कथा संपन्न आहे.
अनेकत्वातून एकत्व व्यक्त करण्याची कला रमजान तडवी यांच्या कथेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
ज्या घटना घडल्या ज्या स्थळी काळी घडल्या
त्यांच्याशी संबंधित ती सर्व पात्रे ,स्थळकाळ व त्या घटनांशी संबद्ध अशा भाववृत्तीचे चित्रण या कथासंग्रहातून दिसतं. स्वाभाविकपणे निश्चित झालेली निवेदनशैली कथासूत्र व , पात्र तसेच घटनांच्या परस्परसंबंधांतून निर्मित संघर्ष, गुंतागुंत वाचकांना सत्यतेकडे घेऊन जातो. रानमेवा कथासंग्रहाच्या सर्व कथांचा उत्कर्षबिंदू ,मध्य व अंत परस्परसंबंधांतून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोणातून केलेले चित्रण दर्शवितात.'हसनुर भाभी' कथेतील लढवय्या स्त्री ची व्यक्तिरेखा दिसते.'कुदरत' कथेतून शेतमजुरी व निसर्ग संतुलन व निसर्ग व मानव यांच्या विषयी नवी जाणीव दिसते. 'मुक्ती' कथेची मांडणी शेतमजुरांचं जगणं, संघर्ष व लेखकाने केलेले शिक्षण, नोकरी साठी संघर्ष व व्यसनाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या मजुराच्या कुटुंबातील वास्तव चित्रण करते. 'पिठाया चांदना' कथा त्या काळातील रेडीओ च्या आठवणींचा धांडोळा वाचकांसमोर आणतो.शहराच्या झगमगाटाकडून पिठूर चांदणं अनुभवायला घेऊन जातांना, हळुवारपणे नैतिकेचा धडा शिकवून जाते.
रानमेवा कथासंग्रह, बोरखेडा, सातपुडा, तेथील निसर्ग, नोकरी व जगणं, आदिवासी तडवी समाजातील वास्तव, तडवी, तडवी बोलीचे शब्द, म्हणी सांभाळून संवेदनशीलता जपतो. कुमुद पब्लिकेशन यांनी रमजान गुलाब तडवी यांचा रानमेवा हा तडवी बोलीच्या मराठी अनुवाद असलेल्या कथांचा कथासंग्रह प्रकाशित केलेला आहे. मुखपृष्ठ सुद्धा निसर्ग चित्रण करणारं आहे. तर रमजान गुलाब तडवी यांच्या बोलीला जतन आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा पहिला भाग म्हणजेच 'रानमेवा' हा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहाचे माध्यमातून साहित्य शिवारात पडलेल्या रमजान तडवी यांच्या प्रथम पाऊलांचा हा प्रवास त्यांना साहित्य समृद्धीकडे घेऊन जाईल. शेतमजुरी करणारा रमजान भाऊ, संघर्ष करत असताना 'सहाय्यक प्राध्यापक' पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले.
अनेक साहित्यकृतीचे मुखपृष्ठ आपल्या कुंचल्याने सजविणारे चाळीसगाव येथील चित्रकार, कवीमित्र दिनेश चव्हाण यांनी कथासंग्रहाला साजेसं व समर्पक मुखपृष्ठ बनवले आहे. कुमुद पब्लिकेशन चा 200₹ मुल्य असलेला असा हा
तडवी बोलीचा अनमोल थासंग्रह 'रानमेवा'
या कथासंग्रहाचे वाचक स्वागत करतीलच.रमजान तडवी यांच्या तडवी बोली जतन व संवर्धन करण्यासाठी सुरु असलेल्या साहित्यसेवेस हार्दिक शुभेच्छा.
#पुस्तक_परिचय लेखन
🌹⚘⚘🌈🌈✍एकनाथ गोफणे
留言