top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

बंजारा भाषेच्या संवर्धनार्थ प्रा .नेमीचंद चव्हाण यांचा अनमोल संग्रह . 'ओळखेर साकी कोसवाड़मय '

पुस्तक परिचय -


'ओळखेर साकी कोसवाड़मय '

बंजारा भाषेच्या संवर्धनार्थ प्रा .नेमीचंद चव्हाण यांचा अनमोल संग्रह .

_______


अकोला येथील सुधाकरराव नाईक कला व उमाशंकर खेतान वाणिज्य महाविद्यालय येथील मराठी विभागाचे सहयोगी प्रा . नेमीचंद चव्हाण यांचा बंजारा भाषेच्या संवर्धनार्थ प्रा .नेमीचंद चव्हाण यांचा 'ओळखेर साकी कोसवाड़मय ' हा अनमोल संग्रह .

चंद्रपूर येथील दमाळ प्रकाशन तर्फे प्रकाशित करण्यात आलेला आहे .

बंजारा समाजाची संस्कृती बोलीभाषा यांचे वेगळं पण त्याच सोबत बंजारा मौखिक लोकसाहित्यातील समृद्ध परंपरा

याची ओळख वाचकांना व्हावी यासाठी प्राध्यापक चव्हाण हे कार्य करीत आहेत .विविध कवींच्या कविता बंजारा बोली भाषेत अनुवादित करण्यात त्यांचा हातखंडा आहे . त्यांची गोर संस्कार ,गोरबोलीतील केणावटे, 'मढगी 'हा काव्यसंग्रह आदी साहित्यकृती काही दिवसात प्रकाशित होणार आहेत .

'ओळखेर साकी कोसवाड़मय ' ही साहित्यकृती त्यांनी आजी आजोबा आई वडील यांच्यासोबतच बालपणात बोली भाषेतील हा अनमोल ठेवा ,ज्यांनी दिला अशा तांड्यातील सर्व जाणकार लोकांना आणि लोकसाहित्य सांभाळणाऱ्या बंजारा समाजातील सर्व लोकांना अर्पण केलेलं आहे .

बंजारा गोरबोलीतील " ओळखेर साकी : कोषवाड्मय " हे त्यांचे पहिले पुस्तक आहे . लेखक म्हणतात की ,

प्राचीन काळापासून तांड्यातील लोकसमुहाच्या व्यक्तित्वाचा महत्त्वाचा भाग "ओळखेर साकी" (कोडे/पहेलीया/ रिडिल्स) हा लोकवाड्मय प्रकार राहिलेला आहे. तांड्यातील लहान लेकरांच्या बुद्धीची क्षमता पारखण्यासाठी, त्यांचे व्यवहारज्ञान, निसर्गविषयक ज्ञान वाढविण्यासाठी, आणि मनोरंजनासाठी तांड्यातील वयस्क शहाण्या माणसांकडून आजही आनंदाने ओळखेर साकी सांगितल्या जाते. या साकीने गोरबोलीतील लोकसाहित्य समृद्ध आहे. मुख्यत्वे शेत शिवार, फळ फूल पाने, पशू पक्षी, निसर्ग, निसर्गातील विविध घटक आणि घरगुती वस्तूसोबतच गोरमाटी समाज आणि संस्कृतीशी निगडित ज्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यावरच ह्या ' साकी ' निर्माण झालेल्या आहेत.

लेखकाने संकलकाच्या भूमिकेतून

गोर लोकजीवनातील अशा ९०० "ओळखेर साकी " संकलित करुन या कोषवाड्मयाच्या रुपाने समाजापुढे आणण्याचा पहिला प्रयत्न केलेला आहे.

या पुस्तकाला डोंबिवली येथे संपन्न झालेल्या पाचव्या अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

भीमणीपूत्र मोहन नाईक यांची प्रस्तावना आहे. भाषा जिवंत राहिली प्रवाहित राहिली तर तिचं अनमोल रुप येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत जातं .नवी उमेद वाचकांच्या मनात जागवत जातं . बंजारा भाषेच्या संवर्धनार्थ प्रा .नेमीचंद चव्हाण यांचा हा अनमोल संग्रह अभिनंदन आणि कौतुकास्पद कामगिरी आहे .

आज आत्याधुनिक मनोरंजनाच्या साधनांमुळे घरातील संवाद कमी होत चालला . पण त्याकाळी घरातील अत्याधुनिक मनोरंजनाची कोणतीच साधनं नव्हती .त्यावेळी संध्याकाळच्या वेळी निवांतपणे घरातील जेष्ठ मंडळी , आजी बाबा लहान मुलांच्या बुद्धीचं कौशल्य विकसित व्हावं यासाठी हा बंजारा बोली भाषेतील शाब्दिक खेळ खेळायचे . त्यामध्ये कोडी दिली जायची आणि लहानांनी ती सोडवायची .

त्याचे अर्थ शोधण्यासाठी ज्ञानरचनावाद उपयोगात आणला जायचा . बालक स्वतः आपल्या ज्ञानाची रचना करून माहितीचा अर्थ शोधून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि योग्य उत्तर नाही दिले तर हरले म्हणून आजी बाबांना परत विचारायचा असा हा सुंदर खेळ घराघरात चालायचा . लेखकाने शिक्षण घेता घेता आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या या विविध गोष्टींचं संकलन केलेलं होतं .अशा 900 कोड्यांचं संकलन प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात , पान क्रमांक एक ते 74 पर्यंत त्यांनी मांडणी केलेली आहे आणि पान क्रमांक 75 पासून 85 पर्यंत या 900 साकींच उत्तर सुद्धा लेखकाने दिलेलं आहे .

अभ्यासकांना उपयुक्त ठरणार हे पुस्तक बंजारा भाषेची मौखिक साहित्यातील अनमोल अशा देणगीच्या रुपाने प्रा . चव्हाण सरांनी . समाजाला दिलेली आहे

भाषेचं सौंदर्य अप्रतिमपणे मांडणाऱ्या या कोस वाङ्मयाची महानता दिसून येते .

बोलतील या साकींची रचना त्यातील शब्दांचे प्रमाण , यमक जुळणी .ऐकणाऱ्याच्या मनातउत्तर शोधण्यासाठी विचारांच्या अनेक वाटा निर्माण करतात .

उदाहरणार्थ या पुस्तकातील काही साकी उत्तरासह वाचकांसाठी देत आहोत .


आस विजळी नार, ओर वाटेपरीया रचं पाल... ओर छ बत्तीस यार, आये जायेवाळेर टोला लेऊ करं नार,

उत्तर :-( जीभ )



आगेम जांऊ बागेम जांऊ... बना डांडीरो लिंबूडा लांऊ.


- उत्तर (अंडे )




आतं छेनी ओतं छेनी, बेपारीर दकान छेनी... खायेन जांऊ तो हात पुरेनी.


उतर :-

(आभाळातून पडणारी गार )




तुरुतुरु रुडी मारचं... एके दनेम तीनसं साठ कोस डगर जावचं.


उत्तर :- (नदी )


धोतीमायीर कल्डो कल्डो... आन् काचळीमाईर नरमो नरमो.


उत्तर :- (नारळाच्या खोबरे )



विविध ठिकाणी रेंगाळणाऱ्या या साकींना एकत्रितपणे जोडून अशा 900 कोड्यांचं संकलन प्रकाशित करण्याचा प्रा . नेमीचंद चव्हाण सरांचा कृतीशिल प्रयत्न

बंजारा भाषेच्या संवर्धनार्थ अनमोल ठेवा आहे .

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बंजारा संस्कृतीच्या सौंदर्याचा साक्षात्कार व्हावा यासाठी उमरी ता . आर्णी येथील परसराम राठोड व विमलबाई राठोड यांना घेऊन , उत्कृष्ट चित्रकार लेखक सुरेश राठोड भिवापूर यांनी आपले कौशल्य पणाला लावलेलं आहे . समर्पक रीतीने मुखपृष्ठ साकारलेल आहे .

आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर 40 संशोधन पर लेख प्रकाशित करुन सामाजिक सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रा नेमीचंद चव्हाण

यांनी बंजारा भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी केलेला

' ओळखेर साकी कोस वाड़मय '

हा पहिला प्रयत्न सर्वांनाच आवडेल यात शंका नाही .

चव्हाण सरांच्या साहित्य विषयक कार्याला हार्दिक शुभेच्छा .

_______

✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे

8275725423

चाळीसगाव .

25 दृश्य0 टिप्पणी

Σχόλια


bottom of page