top of page
खोज करे
लेखक की तस्वीरEKNATH GOFANE

मौखिक इतिहास लिखित स्वरुपात मांडणारी साहित्यकृती - 'गोर इतिहासातील शूरवीर नायक '



पुस्तक परिचय :-


मौखिक इतिहास लिखित स्वरुपात मांडणारी साहित्यकृती - 'गोर इतिहासातील शूरवीर नायक '
----------------------

बंजारा समाजातील शूरवीरांचा इतिहास मौखिक स्वरुपात थाळी नंगारा या पारंपरिक वाद्यांवर आधारित भजनांवर किंवा पारंपरिक लेंगी आणि बंजारा पारंपारिक गीतातून आणि विविध प्रसंगी भेटीतून मौखिक कथा कथनातून मांडला जात होता .अनेक पिढ्या या शूरवीरांचा इतिहास श्रवण करुन प्रेरणा घेत होत्या .
हाच मौखिक इतिहास विविध संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन एकत्रित स्वरुपात 'गोर इतिहासातील शूरवीर नायक ' पुस्तक रुपात प्रकाशित करण्याचे कार्य ,संगत प्रकाशन नांदेड यांच्यामार्फत लेखक याडीकार पंजाब चव्हाण यांनी केलं आणि त्याची प्रथम आवृत्ती 24 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित करुन मराठी साहित्यात एक मोलाचे योगदान त्यांनी दिलेलं आहे .
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात बंजारा समाजातील महान शूरवीर योद्ध्यांनी आपले शौर्य ,वीरता , साहस धाडस दाखविले , बलिदान दिले . पण इतिहासाने त्यांच्या कार्याची नोंद घेतली नाही ; त्या महान शूरवीर योद्ध्यांना हे पुस्तक त्यांनी अर्पण केले आहे .
गोर बंजारा इतिहासातील शूरवीर नायकांची तोंड ओळख व्हावी या निर्मळ हेतूने त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे .
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागात कार्यरत राहून सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले पंजाबराव चव्हाण यांनी 'याडी ' या आत्मकथनासह अंतस्वर समीक्षा ग्रंथ ,सरपंच ग्रामसेवक मार्गदर्शिका' आपले संविधान आपले हक्क
अशा विविध 14 साहित्यकृती निर्माण केलेल्या असून 'गोर इतिहासातील शूरवीर नायक ' हे त्यांचे पंधरावे पुस्तक आहे . त्यांना साहित्य विषयक कार्याबद्दल अनेक सामाजिक गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे .

गोर इतिहासातील शूरवीर नायक या पुस्तकाला भीमणीपुत्र मोहन नायक यांनी प्रस्तावना दिलेली असून; एक ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2023 या कालावधीत समाज माध्यमात एकूण 40 शूरवीरांची लेखमाला पंजाबराव चव्हाण यांनी लिहिली होती . त्याचं संकलन पुस्तक रुपात त्यांनी मांडलेले आहे . ज्यामध्ये एकूण 17 प्रकरणांमधून
लेखकाने गोर बंजारा समाजाची पार्श्वभूमी , दिल्लीवर राज्य करणारे महान राजा ,यासोबत राजा शशांक, राजा भोज , पृथ्वीराज चव्हाण , आला उदल , राजा जयचंद राठोड , हमीर देव चव्हाण ,चित्तोडगडची महाराणी , गोरा आणि बादल ,संत हातीराम बाबा , राव जोधा , महाराणा कुंभा , राणा सांगा ,मानसिंग तोमर , हेमचंद्र विक्रमादित्य राजा मालदेव राठोड , बल्लूनायक बिंजरावत , महाराज गुलाबसिंह , महाराजा रणबीरसिंह आदि योद्यांच्या कार्याची माहिती दिलेली आहे .
आपली भूमिका मांडताना लेखकांनी लोहगडच्या लढाईनंतर मुगल बादशहाने केलेला नर संहार आणि इंग्रज सरकारने या लोकांवर लावलेला गुन्हेगारी जातीचा कायदा आणि त्यामुळे या समाजाची झालेले आर्थिक सामाजिक घसरण याचा परामर्ष घेतलेला आहे .
लेखकाने या पुस्तकाची निर्मिती करत असताना विविध संदर्भ ग्रंथाचा आधार घेतलेला आहे . त्या द्वारे इसवी सन 590 ते 625 या कालावधीतील राजा शशांक यांच्या कार्याचा आढावा .राजा भोज यांच्या कार्याचा आढावा . यासह इतर अनेक वीर योद्ध्यांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे . या पुस्तकाची निर्मिती करत असताना बंजारा समाजातील सांस्कृतिक बाबींचे दर्शन सुद्धा या माध्यमातून होतं आणि त्या गोष्टी बंजारा बोली भाषेतून त्यांनी मांडलेल्या आहेत .

इतिहासाच्या विविध साधनांचा या पुस्तकांमध्ये उल्लेख आलेला आहे .नागपुरातील शिल्पशिलालेख आहे .वि .पूरातन ग्रंथांमधील संदर्भ सुद्धा या पुस्तकाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेली आहे .प्राचीन मंदिर आणि संग्रहालयांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुर्त्यांचा सुद्धा संदर्भ या पुस्तकांमध्ये देण्यात आलेला आहे . लोककथा आपल्या भावार्था सह त्यांनी या पुस्तकांमध्ये मांडलेल्या आहे .
हे पुस्तक वाचत असताना वाचकांना विविध राजे त्यांची घराणी आणि त्यांच्या संस्थानांची माहिती एकत्रित स्वरूपात होत असते .
अशरफ खान तर्फे बंजारा समाजाचा सुवर्ण अक्षरात ताम्रपत्र देऊन सन्मान केल्याची नोंद सुद्धा या पुस्तकात जंगी भंगी राठोड आणि भगवानदास वडतिया यांच्या कार्याच्या उल्लेखात सापडते .
मारवाड राज्याचा साहसी संरक्षक वीर दुर्गादास राठोड यांच्या कार्यावर स्वतंत्र असे लेखन आणि गुरुगोविंद सिंग शिखांचे दहावे महान धर्मगुरू यांच्या कार्याचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने मांडलेला आहे .
बंजारा समाजातील महान क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचा शब्दरूपी इतिहास या पुस्तकाची जमेची बाजू आहे .
नजीर अकबराबादी यांच्या बंजारा नामाचा संदर्भ या पुस्तकातून वाचकांसमोर येतो .
हा ग्रंथ संक्षिप्त रुपात गोर इतिहासातील शूरवीर नायकांचा आहे . या पुस्तकातील सगळेच शूरवीर गोरमाटी बंजारा आहे असा मुळीच आग्रह लेखकाचा नाही .
मात्र या पुस्तकाच्या माध्यमातून पिढ्यान पिढ्या आपल्या शुरवीरांच्या कार्याचे श्रवण करुन प्रेरणा घेणाऱ्या समाज बांधवांना आपल्या वीर योद्धांची माहिती पुस्तक रुपाने करून देण्याचा लेखक पंजाबराव चव्हाण यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे . त्यांच्या आगामी काळातील लेखनाला हार्दिक शुभेच्छा .

पुस्तक परिचय :- एकनाथ लक्ष्मण गोफणे

8275725423


swachhandibharari 2021@gmail.com

147 दृश्य0 टिप्पणी

Comments


bottom of page