पुस्तक परिचय -
बंजारा भाषेच्या जतन संवर्धनासाठी समर्पित काव्यसंग्रह -
- 'म तांडो बोलरोचू '
----------------------
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील लाख खिंड येथील रहिवासी शिक्षक मनोहर रामजी चव्हाण यांनी गोरबंजारा प्रकाशन
तर्फे प्रकाशित केलेला बंजारा बोलीभाषेतील देवनागरी लिपीतला
'म तांडो बोलरोचू . . .
हा गोरबोली कविता संग्रह बंजारा भाषेच्या जतन संवर्धनात उल्लेखनीय कामगिरी बजावणारा ठरेल .
कवी मनोहर चव्हाण यांनी आपल्या बोलीभाषेतील लिहिलेल्या या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण 57 कविता ,सहा वृत्त कविता आणि ११ गझल प्रकाशित केल्या आहे . आपल्या आई वडिलांना हा गोरबोली कविता संग्रह अर्पण करून बंजारा बोली भाषेच्यासंवर्धनासाठी हा अंक समर्पित केलेला आहे .
या काव्यसंग्रहाला डोंबिवली येथील पाचव्या अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भीमणीपुत्र मोहन नाईक यांची प्रस्तावना असून याडीकार पंजाबराव चव्हाण यांची पाठराखण आहे .
बोलीभाषेत लिहिलेल्या या काव्यसंग्रहात आठवणी , संघर्ष , परिवर्तनाची दिशा , शेतकऱ्याची व्यथा ,तांड्याची समस्या , विद्रोह , प्रबोधनाची पहाट , संस्कृतीचा आधार , प्रेम ,जीवन व्यवहार आहे . बोलीतील भाषा सौंदर्याची झलक कवी मनोहर चव्हाण यांच्या मनोहरी काव्यरचनेत दिसून येते . बंजारा बोलीच्या जतन व संवर्धनार्थ कवी म्हणतो ,
तम हजार बोली बोलो,
से सोबतेम भाषा लेलो.
गोर बोलीरे हाकेन,
गोरबोलीमच बोलो.
सर्व प्राणी मात्रांवर दया करावी . अंधश्रद्धेला मुठमाती द्यावी . देवाच्या नावाने पशुबळी देऊ नये .या विषयी जागर करतांना कवी म्हणतो ,
यी तारो भ्रम छ गोरभायी,
देव मांगेनीरे जीव
जरा समजलं मुकी भाषा,
तोन आयदेस किवं.
कवी मनोहर चव्हाण यांची रचना समाजातल्या चुकीच्या प्रश्नावर प्रहार करते .हुंडा पद्धतीवर एका स्त्रीची व्यथा व्यक्त करताना कवी म्हणतो ,
याडी रोव धारोधार
बापेरी देके जायनी दशा.
वाट चुकरोची का? सजना.
चढानं हुंडारी नशा.
कवी मनोहरच्या मनाची ही व्यथा तांडा संस्कृतीत जीवन जगणाऱ्या बंजारा लोकसमूहाची व्यथा आहे .
हा तांडा एकसंघ रहावा .नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्थ असावा, त्यासाठी एका ध्येयाने प्रेरीत होऊन एका दिशेला सर्वांनी पाऊले टाकावी असे कवीला वाटते . कवी म्हणतो ,
दिशा छ मारी ऊ,
जे छ प्रगतीरी वाट.
प्रगतीम चाव वजी
संस्कृतीरी लाट.
एक वे जावा आपण,
नदीरं लाटेनायी.
सेच वेन चालो जावा,
एक दिशा मायी.
बंजारांना जागृतीचा संदेश देण्यासाठी कवी आपल्या शब्दांना पुढे करतो ,
कना उठीस
कना लढीस
तार वेठेरी तू लढायी.
बंद करद आब दुसरेन देणं
शिरा भुंजेन तार कढायी.
कवी मनोहर चव्हाण यांच्या कवितेतून समाज जागृती सोबत समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा एक संदेश आहे .
वाशिम येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलनात 27 मे 2022 रोजी प्रकाशित झालेला हा पहिला काव्यसंग्रह आहे .
बंजारा बोली भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी कवी मनोहर चव्हाण यांचा हा पहिला काव्यसंग्रह रुपी प्रयत्न निश्चितच बंजारा साहित्य क्षेत्रात नवी दिशा देणारा ठरेल . मनोहर चव्हाण यांच्या साहित्य लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा .
___----------------------------------------------------------------------------------------------
✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे
चाळीसगाव
8275725423
تعليقات