वाचकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असलेलंं आत्मकथन -कल्लोळ .
------------------------------------
कल्लोळ आनंदाचा असतो .गोंधळाचा असतो. गोंगाटाचा असतो, खळबळीचा असतो. हास्याचा असतो अन गप्पांचाही असतो. पण डॉक्टर वसंत राठोड यांचा कल्लोळ हा त्यांच्या जगण्याचा त्यांच्या आठवणीचा. अंकुरलेलं बालपण ते स्थिरता .आठवणींचा, संघर्षाचा ,सामाजिक स्थितीचा, मैत्रीचा, नात्याचा ,विश्वासाचा ,आपल्या परिसराचा ,अन प्रेरणेचा.
हा सगळा आठवणींचा कल्लोळ . ही गोष्ट लेखकाला याडी आणि बा सांगतात आणि लेखक नंतर त्या सगळ्या आठवणी ही लिहीत कल्लोळ करीत असतो. पानापानात तो कल्लोळ वाचत असताना वाचकांच्या अंतर मनात उतरत जातो. हा सारा आठवणींचा धांडोळा वाचक वाचत असताना स्वतःला विसरून जातो आणि त्या त्या काळात जातो.
या कल्लोळमध्ये बंजारा समाजाचं सामाजिक चित्रण आहे. निजाम राजवटीतील रजाकरांची दहशतही दिसून येते. शूरवीर ,काटक ,कलागुणाने निपुण समाजाचं चित्रण. शोषण व मागासलेपणाचा वास्तव, तत्कालीन परिस्थिती ही दिसते..
72 चा दुष्काळ लोकांचे आणि जनावरांचे झालेले हाल. रोजगारासाठी झालेली माणसांची भटकंती हे दाखवत असताना मध्येच वसंतराव नाईक यांच्या कार्यावर प्रकाश टाकतो .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्म परिवर्तन आणि गौतम बुद्धांच्या पंचशीलाचाही परिचय सहज हळुवारपणे करून, बळीराम पाटलांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीलाही स्पर्श करून वाचकांना जाणीव करून देण्यात लेखक यशस्वी झाल्याचे दिसून येते.
दत्ता मास्तर ,सोमला मास्तर, वानखेडे गुरुजी, तांड्यातला शिक्षणप्रेमी दिव्यांग प्रेमसिंग मास्तर ,धनसिंग नायकाच्या गोठ्यातील शाळा, गुरुजींच्या दोन बायकांची भांडण.
रामू मास्तरची वडाखालची शाळा याच सोबत भुजंगराव पाटील, खंडोजीराव पाटील, बत्तूसिंग नाईक , भीमा वाघमारे,हेमंत आण्णा ही माणसं .अंजनखेड, पार्डी, आदंबोरी ,सांगागुडा ,सिंगरवाडी तांडा बोधाडीचा बाजार यासह ,नातं गोतं ज्यामध्ये मामा ,मावशी, आत्या नाना नानी ,फुफा-फुपी काका ,बहीण,मामी,मावसा व मित्र यांच्याही आठवण येतात.
समाजाचे चित्रण व जीवनाचे दर्शन घडवणारंं हे आत्मकथन आहे.
तांड्यातील घरासमोरील अंगणातील खडक आणि गुजरी नायकिणीची तत्कालीन श्रीमंती त्यानंतरची अवहेलना ,तिच्यातला स्वाभिमानी बाणा आणि तिने लेखकाच्या शिक्षणासाठी केलेला हट्ट ,लेखकाने तिला दिलेला आधार . तिसरीपासून पुढच्या शिक्षणाची लेखकाची सुरू झालेली जगण्याची धडपड. जिद्द ,मेहनत. बापाचे व आईचे संघर्ष सगळं सगळं मध्ये वाचायला मिळतं .मरकागुडा, इप्पागुडा ,खैरगुडा ,देवला नाईत तांडा यासह विविध गावांचा वाडी ,तांड्यांचा परिचय या माध्यमातून मराठी
वाचकांना झाला .गोरबोली बंजरा भाषेतील संवादामुळे हे आत्मकथन वाचताना आनंदाचे उधाण येतं .
तांड्यातील म्हाताऱ्या महिलांचं एकमेकांशी असललेले संबंध. आपुलकीची भावना ही सुद्धा कशी जिवंत आहे हे चित्र या कल्लोळ मध्ये दिसतं. शाळेतलं पहिलं दप्तर ,पायात रुतलेला काट आई काढत असतानाच चित्रण. वाचकांना भावुक करतात . जगण्याची वाट शोधत तेंदु पत्ता वेचणी व मोहफुलांचा हंगाम, बोंद्रीची सुगी यासोबत बाडीकुत्री , भुता कुत्रा यांच्याशी झालेली मैत्री, झाबली कुत्रीचं झालेल नामकरण सुद्धा या आत्मकथनातून दिसून येते.
स्वातंत्र्याचा काळ ,निजामशाहीचे चित्रण, राम गुरुजींची अक्षर सावली , सोबतच गोरबोलीतील संवाद आत्मकथनात प्राण ओततात.
चक्कीचे पीठ, साठ रुपये चे शासकीय अनुदान.कठोर परिश्रम .मेहनत ,दुःख यामुळे जगणं शिकलेल्या माणसाच हे कल्लोळ ,रेल्वेच्या जनरल बोगीची स्थिती सांगत, प्रसंगी शेळी चारणे ,हॉटेल सह इतर कामे करत अनेक प्रकारच्या संघर्षातुन,तावून सलाखुन निघालेल लेखकाच व्यक्तिमत्व ,हिरवळीच्या सानिध्यात गेलेला लेखक ,ज्ञानसागराच्या विश्वात जातो,कोकणातल्या दिवसातून स्थिरतेकडे कशी वाटचाल करतो हे. आत्मकथनातून दिसून येतं . डॉक्टर वसंत राठोड सर यांनी आपलं जगणं या आत्मकथनाद्वारे मांडलेलं आहे. बारा भागातलं हे आत्मकथन अंकुरलेलं बालपण ते स्थिरत्व यामध्ये विस्तारलेलं आहे. स्वतःची कथा ,स्वतःची व्यथा, स्वतःचे अनुभव त्या आठवणींचा आणि संघर्षांचा कल्लोळ हा वाचकांसमोर येतो. बालपणीचा काळ, बंजारा समाजाची आर्थिक स्थिती .81 वर्षाच्या कायद्याचा जात व सामाजिक अवहेलना यांचे चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाले निजामशाहीतील रजाकारी दहशत ,भटके विमुक्त तीन वेळा स्वतंत्र कसे झाले. हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. रतनसिंग आणि सामकीचा परिवार सोबतच गोंड परधान अंध समाज बेलदार गवंडी ,घिसाडी, बौद्ध समाजाचा म्हणजे एकंदरीत 'बहुजन' समाजाच्या स्थितिचही हे चित्रण वाटत आहे..
स्वावलंबी जीवन जगण्याची रीत देतात. तांडा या आत्मकथन नंतर एक दमदार आत्मकथन कल्लोळच्या रूपात डॉक्टर वसंत राठोड यांनी मराठी साहित्यात आणलं. विशेष म्हणजे गोरबोली बंजारा भाषेतील संवादामुळे बंजारा भाषेसोबतच ,मराठी भाषेची ही साहित्य सेवा त्यांच्या लेखणीतून झाली.शोले चित्रपटाचे तांड्यावर झालेले परिणाम याचे चित्रण हे तांड्याच जगणं दाखवतं. वस्तीगृहातली आठवणी आणि गायक दौलत राठोड ची कल्पकता व अभिव्यक्ती ही सुद्धा सुंदरपणे लेखकांनी मांडली आहे . कल्लोळ विदर्भ,मराठवाडा ,कोकण ,खान्देश ,पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईची पण सफर घडवून आणतो.इतिहास ,भूगोल व्यापून राजर्षी शाहूमहाराजांचे कार्य दाखवत .गड किल्ले व मराठ्यांचा पराक्रम पण दाखवितो. कोकणची भूमी व कष्टकरी माणसांचेही दर्शन घडवितो.बंजारा संस्कृतीचे दर्शन,आभूषण व बोलीतील गीतांंचा परिचय करून देतो.तांड्यातील बालपण तेथील खेळ खेळवितो.
कल्लोळचे अनेक अर्थ आहेत पण जगण्याचं बळ देणारा ,स्वाभिमानाने उभं ठेवणारा. एक समर्थ लेखक घडवणारा हा ‘कल्लोळ. सर्वांनी वाचलाच पाहिजे. अशी मी या निमित्ताने विनंती करतोय. माजी कुलगुरु ,साहित्य अ.भा.म.संमेलनाचे अध्यक्ष मा.नागनाथ कोत्तापल्ले यांची या आत्मकथनाला लाभलेली प्रस्तावना या साहित्यकृतीचं मराठी साहित्यातलं अनोखेपण सिद्ध करते.
डॉक्टर वसंत राठोड सरांच्या विविध साहित्यकृती त्यांचे सामाजिक विषयावरचे लेख मी नेहमी वाचत असतो .जागपालका ,जगणं रानफुलांच यामधूनही त्यांची सामाजिक बांधिलकी ही दिसून येते . बंजारा भाषेतील काचळी फेट्या पासून ते भेबरी ,लिटी खांड पर्यंत अनेक बंजारा बोली भाषेतील शब्दांचे मराठी अर्थ दिलेले आहेत
अंकुरलेलं बालपण जगण्याची वाटा हात ज्ञानाचा वाटसरू राम गुरुजींची अक्षर सावली दारिद्र्याचे श्रम पुरस्कार आंबा आणि पराठा मी नापास का झालो शाळा कॉलेज शाळा हॉटेल आणि स्वावलंबन वस्तीगृह आणि मायेची सावली हिरवळीच्या सानिध्यात ज्ञानसागराच्या विश्वात कोकणातले दिवस आणि मांडवीतलं स्थिरत्व.असा हा संघर्षाचा काळ कल्लोळ वाचल्यानंतर दिसून येतो. भरपूर मेहनत करो ,खुप शिक्षण शिको ,हे सांगणारे लेखकाचे 'बा' अन मन लगान शिक ,पुस्तकेन धेनेम लं अस सांगणारी 'या'
दोघांच्या चरणी लेखक डॉ.वसंत राठोड यांनी समर्पित केलेला जीवनानुभूतीचा हा कल्लोळ आहे.
वाचकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असलेलं हे आत्मकथन - मराठी साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करेल हे मात्र खरे..
माननीय डॉक्टर वसंत राठोड यांच्या साहित्य लेखन प्रवासाला gorbolibanjararadio.com तर्फे हार्दिक शुभेच्छा.🌹🌹🙏________________________________
✍️पुस्तक परिचय लेखन-एकनाथ ल.गोफणे.
________________________________
✍️पुस्तक परिचय लेखन-एकनाथ ल.गोफणे.
Comentários