पुस्तक परिचय
____________________
संविधानासह मानवी मूल्यांच्या जाणिवा निर्माण करणाऱ्या विद्रोही नायकांच्या कथांचा संग्रह -भिलाटी .
___________________
आदिवासींच्या जबरदस्ती धर्मांतर विरुद्ध लढणारा जांभल्या बरडे , व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी संविधानाची मदत घेणारी ब्युटी क्विन नंदा , अन्यायाविरुद्ध लढणारा राजेश , परल्या नाईक , सातमाळ मधील रंगू भिल ,
गजऱ्या भिल , टिल्लू टाल्याच्या अन्यायाविरुद्ध एल्गार करणारी 'कस्तुरी ' व्यवस्थेच्या झोटींग माणसांविरुद्ध लढणारा व्यंकू नाईक , मानवी मूल्य शिकवून प्राणी मात्रांसह निसर्गावर प्रेम करणारा लाल्या नाईक . दुसऱ्यांना मदत करणारा बांग्या नाईक , परिवर्तनाचा विचार करणारा कणा नाईक . आमल्या , घुली , जिवा सोमा या नायकांना भेटायचं असेल तर वाचकांनी
संविधान , आत्मसन्मानासह मानवी मूल्यांच्या जाणिवा निर्माण करणाऱ्या विद्रोही नायकांच्या बारा कथांनी सजलेला लेखक सुनील गायकवाड यांचा भिलाटी हा कथासंग्रह वाचावा लागेल .
सुनील गायकवाड हे आदिवासी साहित्यातलं एक सुपरिचित असं नाव आहे . अहिराणी , भिलावू , मराठी हिंदी भाषेत त्यांची साहित्य संपदा आहे. विविध साहित्य विषयक कार्यक्रमात व साहित्य चळवळीत उत्साहाने एका कार्यकर्त्याच्या रुपात सहभागी होणारे ते लेखक आहेत .
उत्तम कवी ते उत्कृष्ट कथाकार हा साहित्याचा चढता आलेख त्यांच्या धडपडीला जगासमोर आणतो .तितुर
ब्लॅक ब्युटी ,बिजली ,अथोला ,गावठाण ,सातमाळा
भिलाटी ,हुरडा ,नवाब ,सालदार, पेसा ,तारपा
या शीर्षकाच्या १२ कथांचा एक तपस्वी असा हा कथासंग्रह आहे.
साहित्य अक्षर प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला 'भिलाटी ' हा कथासंग्रह आहे . मुखपृष्ठ आणि चित्र 'सरदार' यांनी प्रसंगानिरुप खूप छान रेखाटलेली आहे .
भिलाटी हा कथासंग्रहाची प्रथम आवृत्ती 14 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित करण्यात आली . अक्षर जुळणी व मुद्रित शोधन तनिक सर्विसेस चिपळूण यांनी केलं असून दोनशे रुपये मूल्य असलेला हा कथासंग्रह क्रांती राऊत जनता नगर संगमनेर जिल्हा अहमदनगर यांनी साहित्य अक्षर प्रकाशनामार्फत प्रकाशित केलेला आहे .
कथा संग्रहातील लेखन शैली लेखकाच्या वेगळेपणाची ओळख देते. संवादातील क्रमबद्धता , साहित्यमूल्य , वाचनमूल्य यासह कथेचं शिर्षक , कथेतील पात्रांची नावे , प्रसंग चित्रणातील अप्रतिम मांडणी वाचकांच्या डोळ्यासमोर प्रसंग उभे करते. या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाचा निरीक्षण कौशल्य विषय मांडणी सादरीकरणातील अप्रतिम स्वतंत्र शैली ,मानवी समूहासह निसर्ग ,प्राणी ' पक्षी यातील बारकावे चपलखपणे त्यांनी मांडले आहे .
'निठोबा ' म्हणजे संग्रह या शब्दाची ओळख , 'एक कारभारी अन नऊ चौधरी ' या सारख्या बोलीतील म्हणी 'वाक्प्रचार यासह सारंगखेड्याचा घोडेबाजार , सातमाळ डोंगर रांगा , सह्याद्री , खान्देशची शेती ,येथील शेतकरी यांचे वर्णन यांनी कथासंग्रहात आत्मीयता निर्माण झाली आहे .
हा कथासंग्रह सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासही सुधारणावादी चळवळीला अधोरेखित करतो .
जांभल्या बरडे सह इतर कथानायकांचे चित्रण वाचतांना लेखकाचे कसब दिसून येते .
आदिवासी भिल्लांचं जगणं , व्यवस्था त्यांना हक्क देत नाही त्या विरुद्धचा त्या माणसांचा विद्रोह , आपला स्वाभिमानी बाणा कायम ठेवणारी सामान्य माणसं या कथासंग्रहात दिसतात . भिलावू , आदिवासी बोलीसह इंग्रजी , हिंदी मधील संवाद व रोडालीच्या लयबद्ध भाषेने कथासंग्रहात ठसा उमटविला आहे .
राष्ट्रभक्ती , निर्मळ प्रेम , अन्यायाविरूद्ध उठणारा विद्रोही आवाज , सरपंच , पोलिस पाटील , ठेकेदार यांच्या दहशतीला लागलेला सुरुंग . आदिवासी पाडा , भिलाटी मध्ये घुमणारा संविधानाचा जागर , समाधानी, स्वाभिमानी वृत्ती . निसर्गप्रेम , कालु भाऊची मजूर चळवळ , पेसा मधील ग्रामसभेच्या अधिकाराची जाणिव , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघटीत व्हा , संघर्ष करा हा मंत्र , वामनदादा कर्डक व संभाजी भगत यांचा लोकजागर , क्रांती ज्योती म .फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेणारी ज्योत . दर्जेदार शिक्षण प्राप्त करणारा नायक . माणूस व प्राण्यांमधील स्वभाव वैशिष्टे या गोष्टींची मांडणी आल्याने 'भिलाटी ' हा कथासंग्रह आदिवासी पाड्याचा आवाज बनून क्रांतीची मशाल घेऊन , दमदारपणे बोलीभाषेचे जतन करीत मराठी साहित्य क्षेत्रात आला आहे . कथातंत्र अवगत असलेला कथाकार म्हणून सुनिल गायकवाड यांचे देशाच्या साहित्य अमूल्य योगदान आहे .
कथासंग्रहाची प्रस्तावना प्रभू राजगडकर यांनी केली असून मलपृष्ठावर कथाकार डॉ. संजय बोरुडे यांची साथ देणाऱ्या शब्दांची अतुलनिय पाठराखण व लेखकाचे पूर्ण आदिवासी लोकजीवनाचा सार सांगणारे छायाचित्र स्थापित केले आहे .
तंट्या मामा भिल , राणा पुंजा भील , खाज्या नाईक ,गुलाब्या नाईक , हल्दीबाई भिल ,
कालीबाई भील , भागोजी नाईक , देवीसिंग नाईक भील या लढवय्या भारतीय क्रांतिवीरांना हा कथासंग्रह त्यांनी अर्पण केलेला आहे .
________________पुस्तक परिचय____
एकनाथ लक्ष्मण गोफणे .
चाळीसगाव
📱८२७५७२५४२३
Comments