पुस्तक परिचय : -
विविधांगी अनुभवांचा सारजासूत यांचा काव्यांकुर.
____________________
खान्देशातील जामनेर मधून आपल्या काव्य निर्मितीचा छंद जोपासत ,जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवीत साहित्याची सेवा करणारे हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्व दिगंबर दगडू पाटील म्हणजे
डी. डी. पाटील सर. यांचा दुसरा काव्यसंग्रह 'काव्यांकुर' हा विविधांगी अनुभवांना शब्दबध्द करीत मराठी साहित्याची सेवा करणारा, वाचकांना गुंतवून ठेवणारा असा काव्यसंग्रह आहे.
कवी डी डी पाटील हे शासनाच्या नाशिक विभागातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.
विद्यार्थ्यांना घडविता घडविता ते स्वतः घडत गेले अन आपल्या अनुभवाची मांडणी शब्दबद्ध पद्धतीने करत गेले.
कविता संग्रहातील कविता ग्रामीण मातीशी नाळ जुळणाऱ्या आहेत.
श्री गजानन या कवितेपासून काव्यसंग्रहाची सुरुवात तर 'एक काळ असा होता ' या शीर्षकाच्या कवितेने या काव्यसंग्रहातील शेवटची कविता या अशा एकूण 47 कवितांचा हा संग्रह आहे.या काव्यसंग्रहामध्ये भावभक्ती , शिक्षण ,आदिवासी लोकजीवन , ऋतुचक्र ,शेतकऱ्याची व्यथा आणि कथा विद्यार्थ्यांच्या निरोपाचे ऋणानुबंध ,आणि सदैव प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा पण या काव्यसंग्रहाची साहित्यिक मूल्यं दाखवितो.
' नैवेद्य ' या कवितेत
कवी देवाला हिंमतीने प्रश्न विचारतो आणि सामाजिक वास्तवतेची ,विषमतेची जाणीव वाचकांना होते .
कवी म्हणतो
'बसल्याच जागी । येई तुला ताट नैवेद्याचे नाव । मिळे तयास
सारे आयुष्य मी । धुंडीतसे गाव परी रिकामेच । पोट माझे
काव्यसंग्रहातल्या भावगीतातून कवी 'आत्मशोध ' करण्याचा सल्लाही देतो .
मातृदेवो भव या कवितेतून आईचे महती 'स्त्री चं महात्म्य सांगताना कवी ,देवकी , यशोदा ,जिजाऊ राणी पद्मिनी ,झाशीची राणी लक्ष्मीबाई ,सावित्रीबाई फुले आणि इंदिरा गांधी यांच्या कार्याचा गौरव करतो .
'माऊली ' ही कविता आईच्या जगण्याची धडपड मांडते.
कवी म्हणतो ,
सायंकाळी परतोनी
घरी येते ती थकूनी
डोळ्यातला उभा थेंब
घास घाली पारखुनी '
कवी स्वतः शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाचा त्यांनाही आलेला अनुभव त्यांनी 'शिक्षण आणि शिक्षक ' या कवितेत शब्दबद्ध केला आहे . शासनातर्फे शिक्षकांना लावण्यात आलेल्या विविध शैक्षणिक कामांचा पाढाच त्यांनी या कवितेतून वाचून समाजापुढे मांडलेला आहे . एक विसंगती मार्मिक ढंगाने मांडतांना कवी म्हणतो '
'लग्न न झालेला मास्तर
कुटुंब नियोजनाचं हित सांगू लागला
सहकाऱ्यांचे अनुकरण करत करत इलेक्शनच्या ड्युट्याही करू लागला .
कवींचा अनुभव हा या काव्यसंग्रह मध्ये शब्दबद्ध करण्यात आलेला आहे . आदिवासी भागात नोकरीच्या निमित्ताने आदिवासी लोकजीवन पाहत असताना ते शब्दबद्ध केले आहे . 'आम्ही आदिवासी 'या कवितेत कवी म्हणतो ,
'आम्हा आदिवासींच्या कथा
करीत आहेत मनाला व्यथा पावलो पावली आम्हा चिंता
नाही शासनाला याची खंता
कड्या कपारीचे रहिवासी
आम्हा म्हणता आदिवासी ' ..
या काव्यसंग्रहात हिरवागार श्रावण आणि चैतन्यमय वसंत ऋतू सुद्धा दाखविण्यात कवी यशस्वी झालेले आहेत .
शेतकऱ्याची व्यथा मांडताना 'न्याहरी 'या कवितेतून कवी सांगतो
घडीभर आराम करुन ।मन त्याचं विसावले
पुन्हा बिचारा उठला ।तसाच औता कडे गेला .
'गावाचा पालट 'या कवितेतून बदलत्या परिस्थितीचे वर्णन करण्यात आलेला आहे .
' माणूस कुत्रा आणि माणूस या शिर्षकाच्या कवितेतून माणसाच्या नीतीवर कवी प्रकाश टाकतो .
काव्यसंग्रहातील कविता अभंग , भक्तीभाव , मार्मिक ढंगात येते
चिंतन करण्यास लावते . विरहाची जाणीव करुन देते . एस . एस . सी . च्या विद्यार्थ्यांना निरोप देताना कवी हळवा होतो .
नळावरील भांडण कविता ग्रामीण दर्शन घडविते .
अजिंठा लेणीचे आणि वाघुर नदीचे कवीच्या गावातल्या प्रवासाचे वर्णन असलेली ' अजिंठ्याचं लेणं ' कविता मातीशी व जगाशी जोडते .
छत्रपती शिवरायांचा पोवाडा महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाचे शौर्य गान गाताना कवी प्रेरित होतो .
कवी डी डी पाटील -सारजासुत यांच्या 'काव्यांकुर 'या काव्यसंग्रहाची प्रस्तावना डॉ . किसन पाटील सरांनी लिहिली आहे .
विविधांगी अनुभवांचा सारजासूत यांचा हा काव्यांकुर. सर्वांनी वाचावा असा आहे .श्री रामकृष्ण गोरे यांनी सुंदर असं मुखपृष्ठ बनवलेलं आहे .
__________________
✍️ एकनाथ लक्ष्मण गोफणे
८२७५७२५४२३
चाळीसगाव .
Comments