"संघर्षाचं सोनं" करणाऱ्या रिअल हिरोची एक जबरदस्त कहाणी!
पुस्तकाचे नांव:📙
एका शिक्षकाचं प्रेरणादायी आत्मकथन
संघर्षाचं सोनं!
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
✍️ लेखक- तात्याराव धोंडीराम चव्हाण ,छत्रपती संभाजी नगर
99 21 56 22 23
✍️समीक्षक- याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद
94 21 77 43 72
=================================
लेखकः तात्याराव धोंडीराम चव्हाण उर्फ ता.धों. चव्हाण हे गोरबंजारा काव्य क्षेत्रातील सर्व दूर परिचित असलेले एक नाव ! एका शिक्षकाचं प्रेरणादायी आत्मकथन संघर्षाचं सोनं या कथारूपी आत्मकथनाचे प्रकाशन 29 जुलै 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे. त्याबद्दल गोर बंजारा साहित्य क्षेत्रातील तमाम विचारवंताकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
गोरबंजारा साहित्य क्षेत्रामध्ये याडी, तांडेल, गोठण, वादळवाट, अंधाऱ्या रात्रीचे स्वप्न, लदेणी, आयुष्य जगताना, आक्रोश आणि कल्लोळ ही प्रचंड गाजलेली पुस्तके. यामध्ये लेखक तात्याराव धोंडीराम चव्हाण यांनी संघर्षाचे सोनं हे अप्रतिम पुस्तक टाकून भर घातली आहे.
"संघर्षाचे सोनं" हे एका शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास नाही तर गोरबंजारा समाजाच्या चालीरीती, रूढी, परंपरा, संस्कृती याचा आलेख म्हणावा लागेल. सदर पुस्तकांमध्ये 21 प्रकरणे असून यामध्ये पूर्वपिठीका, बालपण आणि प्राथमिक शिक्षण, शिक्षणातील अडथळे, आबा आणि चुन्याचा घाणा, ...आणि विहिरीत पोहणं थांबलं, सातवी बोर्ड परीक्षा, आठवीत शिक्षण थांबले, सुरती नानीचे उपकार, दहावीत शिक्षणाची परवड ,कुंडलिक मामाची आठवण, खांडीतील रात्रीचा जीवघेणा प्रवास, डी.एड. शिक्षणातील संघर्ष, डी.एड .सुटलो नी लग्न झाले, जैन स्पिनर्सला रामराम, ... आणि मी शिक्षक झालो, नोकरीचे पहिले गाव सोलेगाव, आदर्श शाळा पारुंडी तांडा, शाळा मैदानातील जनावरांचा बाजार, शालांत परीक्षा १००% टक्के निकाल, अखेरची शाळा प्रशाला ढोरकिन आणि सेवापूर्ती गौरव, सेवा निवृत्तीनिमित्त नागरी सत्कार अशी एका पेक्षा एक दर्जेदार प्रकरणे असून त्यामध्ये लेखकांनी आपला जीवन संघर्ष अत्यंत खुबीने मांडलेला आहे. आणि तो वाचकांचे मन हेलावुन टाकतो. प्रत्येक प्रकरण वाचता वाचता डोळे तर पाणावतात मात्र अंगावर काटे शुद्धा येतात. त्यामुळे लेखक हे यशस्वी झालेले आहे.
लेखकांनी आपली जीवन संघर्षाची कहाणी वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून मांडलेली असून वाचताना ते मनाला चटका लावुन जातात. संभाजीनगर तालुका आणि जिल्ह्यातील एक लहानशा कचनेर तांड्यामध्ये लेखकाचा जन्म झाला. घरामध्ये अठराविश्वे दारिद्र्य, ऊसतोड कामे करून हा जगणारा कुटुंब. त्यामुळे लेखकाचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. ज्या ठिकाणी खाण्याची सोय नाही. तिथे मात्र शिक्षणाचा विचार लेखकांच्या वडिलांच्या मनात कसा आला हे फार महत्त्वाचे आहे. लेखकांचे वडील धोंडीराम काका यांनी आपला मुलगा शिकला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, असे त्यांना मनोमन वाटायचे. म्हणून त्यांनी आपल्या चुलत बहिणीकडे लेखक तात्याराव यांना ठेवून ते आपल्या बहिणींना म्हणतात ये छोरांना तारे घर रखाड, वोरो लखणो वेजायं हा प्रसंग वाचताना डोळे डबडबतात. लेखक सातवीत असताना लेखकाची आई मठाबाईने लेखकाशी केलेला संवाद हा लाख मोलाचा दिसतो. अशिक्षित असलेली आई सुद्धा अनमोल उपदेश करते. हे वाचून समाधान होतं. लेखकाला आई म्हणते बेटा आबं तारो गुरुजीच तार याडी बाप आणि गुरूबी छं. प्रंचड कठीण परिस्थितीमध्ये शुद्धा लेखकांनी शिकण्याची जिद्द सोडली नाही. आपल्या घराचे अठराविश्व दारिद्र्य जर घालवायचे असेल, तर आपण शिकलो पाहिजे. ही खूणगाठ मनासी बांधून लेखकाने आपले शिक्षण पुढे सुरू ठेवले. मोलमजुरी करत करत लेखक शिकला. शिक्षण घेत असतांना त्यांना अनेक अडचणी आल्या. परंतु ते घाबरले नाही. ऊसतोडीचे काम करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या संघर्षातील अडथळयाचा लेखाजोखा त्यांच्या संघर्षाचे सोनं हे पुस्तक वाचताना पानोपानी दिसून येते. जीवनातील अनेक प्रंसग वेदनादायी आणि अत्यंत दु:खदायक आहेत. लेखकाने केलेली गरीबीवरील मात, सर्वांशी सौजन्यपूर्ण जपलेले संबंध यामुळे लेखकाचा जीवनप्रवास हा वाचनीय झालेला आहे. संघर्षाचा सोनं हे पुस्तक लिहिण्याची सुरुवात त्यांनी खांडीतील रात्रीचा जीवघेणा प्रवास या प्रसंगापासून सुरू केल्याचे मनोगतात नमूद आहे. हे पहिले प्रकरण लिहिल्यानंतर त्यांनी आपल्या वर्गमित्रांना आणि इतरांना पाठवले असता तो प्रसंग वाचून अनेक मित्रांनी आपण चांगले लेखक आहात. आपली लेखनशैली मनोवेधक असून वाचकांची उत्सुकता वाढवणारी आहे. अशा प्रकारच्या अनेक प्रेरणादायी प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या त्यामुळे त्यांनी संघर्षाचं सोनं हे अप्रतिम पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. आठवीत शिक्षण थांबले. ही घटना प्रत्यक्ष घडत असल्याचे प्रकरण वाचतांना लक्षात तर येते. परंतु आपले डोळे सुद्धा पाणावतात. लेखकाचा हा जीवन संघर्ष केवळ त्यांच्या जीवनाचा नसून तमाम गोरमाटी समूहातील प्रत्येक तरुणाचा आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण गोरबंजारा समाज हा कायम भटकंती करणारा आणि उपेक्षित असणारा समाज. सर्वांनाच दारिद्र्याचे चटके सहन करावे लागले. त्यामधून सगळ्यांनाच बाहेर पडावं लागलं. ही जीवन संघर्षाची कहाणी हुबेहूब एखाद्या सिनेमासारखी त्यांनी मांडलेली आहे. लेखकाच्या जीवनातील 47 वर्षांपूर्वीचे काही प्रसंग त्यांनी जसेच्या तसे प्रचंड ताकतीने मांडलेले आहे. ही खरी लिखाणाची ताकद आहे. लेखक लिहितो की सदर प्रकरण मांडतांना अक्षरशः मी घायाळ झालो. खूप रडलो. अगदी त्याच प्रकारे वाचक सुद्धा घायाळ होतात. आणि ते रडल्याशिवाय राहत नाही. इतके दर्जेदार आणि अंगावर रोमांच आणणारे असे अनेक प्रसंग या संघर्षाचं सोनं यामध्ये मांडलेले आहे. 15 मे 1981 रोजी लेखकाचा यमुनाबाईशी झालेला विवाह हे प्रकरण तेरावे असून डीएड सुटलो नी लग्न झाले यामध्ये आलेले आहे. त्यामध्ये यमुना वहिनींनी लेखकाला दिलेली समर्थ साथ ही तमाम महिलांसाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल. लेखकाच्या जीवन संघर्षात सुरती नानीचे उपकार या आठव्या प्रकरणांमध्ये लेखकांनी आपल्या नानीबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता ही खरंच वाचनीय असून ते आपल्या नानीबद्दल सांगतात. सुरती नानी की सुरत मेरे लिए भगवान के सुरत से भारी और प्यारी है।
लेखक तात्याराव चव्हाण यांना शिक्षणासाठी फार संघर्ष करावा लागला. गावामध्ये शाळा नसल्याने पाचवीला असताना एकट्याने मसनवट्याच्या वाटेचा प्रवास अथवा खांडीतील रात्रीचा जीवघेणा प्रवास हे वाचतांना अगं शहारून जातं. भगीरथच्या नव्या पुस्तकाचा संच बघून झालेली लेखकाची घालमेल हे खरंच विचार करायला भाग पाडते. लेखकाचा आबा हे अपंग होते. तरी आपल्या मुलासाठी ते दिवसभर घाणा हाकलायचे आणि आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दोन पैसे कमवायचे. आबा आणि लेखक तात्याराव चव्हाण आणि आई मठाबाई हे संघर्षाचं सोनं यामधील प्रमुख नायक असुन त्यांच्या जीवन संघर्षाची ही मनाला वेडं लावणारीच नाही तर प्रेरणा देणारी कहाणी आहे .राखी पौर्णिमेला नवविवाहीत बहिणीच्या मृत्यूचे दुःख लेखक अजून विसरलेले नाही. तसेच मुलगी (ललिता) अस्मिताचा मृत्यू हे प्रचंड वेदनादायी आणि दुःखमय प्रसंगाची लेखकाने केलेली मांडणी काळीज चिरून टाकते. वाचताना डोळे पाणवतात .आबा, सुरतीनानी, कुंडलिक मामा ,अशा विविध व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन त्यांनी प्रभावीपणे या पुस्तकात मांडलेले आहे. लेखकांनी केवळ आपल्या शिक्षणासाठी केलेला संघर्ष मांडलेला नसुन नोकरी लागल्यानंतर शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी फार मोठा संघर्ष केल्याचे या पुस्तकात दिसून येते. जसे आडूळ प्रशालेच्या मैदानातील जनावरांचा बाजार हटवणे, ढोरकीन प्रशालेतील दहावी परीक्षा केंद्रासाठीचा लढा, आडुळ ते पारुंडी या खांडीतील जवळचा रस्ता मंजूरीसाठी केलेला पाठपुरावा, थापटी ते पारूंडी या रस्त्यावर वाटसरूसाठी सावली देणाऱ्या वटवृक्षाची लागवड व त्यांचे संवर्धन अशी अनेक कामे लेखकांनी केल्याची दिसून येते. लेखकाने हे आत्मकथन त्यांच्या जीवनातील विविध संघर्षाचे निर्भीडपणे लेखन केले आहे. कोणत्याही व्यक्तीचा समूह, समाज यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. लेखकाची दहावीत झालेली शिक्षणाची परवड, डीएड शिक्षणातील संघर्ष हे प्रकरण लेखकांनी फार ताकतीने आणि कुठलेही आड पडदा न ठेवता त्यांनी आपल्या जीवन संघर्षाची कहाणी मांडलेली आहे. याडी पुस्तकाचे बारकाईने वाचन केले. तेव्हा आपण आपले अनुभव लिहावे, असे वाटले हे लेखकांनी आपल्या मनोगतात मांडलेले विचार म्हणजे लेखकाचा प्रामाणिकपणा दर्शविणारे आहे. लेखकाचे आदर्श जीवन खरोखर आदर्श शिक्षकासारखे असून त्यांचे सुंदर व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी आहे. त्यांनी प्रत्येक काम उत्कृष्टपणे केल्याचे दिसते. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना तालुका आणि जिल्हा आदर्श पुरस्काराने शासनाने गौरवांकित केले आहे. ते आज सेवानिवृत्त झाल्यानंतरही संघटनेच्या माध्यमातून शिक्षकाच्या सेवेत हजर असतात. ते आपल्या दर्जेदार कवितातून इथल्या समाज व्यवस्थेवर ते प्रहार करतात. अनेक सामाजिक संघटनेशी त्यांचा जवळचा संबंध असून ते गोरबंजारा समाजामध्ये सामाजिक, सांस्कृतिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असतात. गोरबंजारा समाजासाठी केलेले कार्य गौरवास्पद आहे. त्यांचा जीवन संघर्ष हा तमाम बहुजनांना प्रेरणादायी असून नक्कीच या पुस्तकाचे वाचकवर्ग स्वागत करतील अशी मला खात्री आहे. नव तरुण पिढीला प्रेरणादायी असलेले हे पुस्तक एखाद्या विद्यापीठांमध्ये अभ्यासले जावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. गोरबंजारा समाजातीलच नाही तर तमाम बहुजनातील विचारवंत, बुद्धिवंत वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे असेही मला मनोमन वाटते. पुस्तकाचे मुखपृष्ठ वाचकाचे लक्ष वेधुन घेण्यासारखे आहे. लेखकांचे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली करीता शुभेच्छा💐💐 देतो आणि थांबतो!
प्रकाशक
अशोक कुमठेकर रजत प्रकाशन छत्रपती संभाजीनगर
पृष्ठ -192
किंमत- 325
✍️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद-9421774372
Comments