पुस्तक परिचय
------------------
१०५ कवितांना सोबत घेऊन जिद्दीने मजबूत वळलेली 'वज्रमूठ '
---------------------
'वज्रमूठ ' हा कवितासंग्रह नांदेड येथील राज्य गुप्त वार्ता विभागामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक महेश बाळासाहेब लांडगे यांचा आहे . पोलीस दलात येण्यापूर्वी महेश लांडगे हे प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत होते .त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार . समाजरत्न पुरस्कार या सोबतच राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला आहे .
महेश लांडगे यांचा हा काव्यसंग्रह आई-वडिलांच्या कष्टाला , माया , ममतेला पुढे आणतो . सोबतच
प्रलयातून निसर्गाच्या प्रकोपातून जिद्दीने कंबर कसून 'सरस ' होण्याचा प्रयत्न करते .
वज्रमूठ कवितेत कवी म्हणतो ,
' असे जरी परिस्थिती मजबूर
पण जिद्द आहे मजबूत
संगे घेऊन कारभारणीने
वळली आहे वज्रमूठ !
'वज्रमुठ ' या काव्यसंग्रहामध्ये एकूण105 कविता समावेशित करण्यात आल्या आहेत . भारत भूमीच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या शहीद जवानांना व कोरोना योद्ध्यांना हा काव्यसंग्रह त्यांनी समर्पित केलेला आहे .या काव्यसंग्रहाची प्रस्तावना कृष्णकांत उपाध्याय पोलीस उपायुक्त मुंबई यांनी केलेली आहे .
'नसल्या भुजा म्हणून
थकलो अजिबात नाही ,
तळहातावर नाहीत रेषा
म्हणून ललाट बदललं नाही . '
या काव्यसंग्रहात नातीगोती आणि सामाजिक स्थिती त्यासोबत मित्राला दिलेला सल्ला आहे .
शेतकऱ्याला आधार देणारी कविता आहे .
बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन भीम जयंती साजरी करण्याचा एक विचार मांडत आणि अण्णाभाऊ साठे यांची आठवण काढत .
छत्रपती शिवरायांना पोवाड्यातून मानाचा मुजरा करत पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या कार्याचा गौरव या संग्रहातील कविता करतात .
प्राथमिक शिक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत प्रवास करत असतांना आलेले अनुभव मनात उमटलेल्या भावना या शब्दरूपाने महेश लांडगे यांनी या काव्यसंग्रह मध्ये मांडलेले आहेत . समाजाची स्थिती स्त्री मनाची व्यथा 'मी निर्भया बोलते , या कवितेत पुरुषार्थाला प्रश्न विचारण्याची हिंमत करते .
पोलीस दलात कार्यरत राहून तेथील अनुभवांवर आधारित कालची नाईट ही कविता आणि पोलीस स्थापना दिवस या संदर्भातील कविता विभागाच्या कार्याचा आढावा घेते . मराठी भाषेची थोरवी गाणारी कविता आहे . जगायचं कसं असा मित्राला सल्ला देते . कलियुगात भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे गाणे गात , पैशाच्या जोरावर मुजोर झालेल्यांना नामोहरम करते .
आयुष्य आहे एक भोवरा या कवितेतून आयुष्याचे पदर उलगडत जाते .
काव्यसंग्रहातील सर्वच कविता अप्रतिम आहेत .
श्रावणाची पालखी या कवितेमध्ये
कवी म्हणतो ,
'कोवळ्या पानांची लकाकी
ही नवतेजाची चकाकी ,
मन आनंदून जाई
ही श्रावणाची पालखी !
या ओळीतून निसर्ग सौंदर्य दाखवित हा काव्यसंग्रह नातीगोती शेती माती आणि सामाजिक स्थिती दाखवतो .
बालपणात अंगणामध्ये पक्षांची शाळा भरते याचेही वर्णन या काव्यसंग्रहात कवितेच्या रूपाने आलेला आहे कोरोना काळातील कविता वाचकाच्या मनाचा ठाव घेतात .
पोळा कवितेत बळीराजा व बैलाचं नात दाखवितांना कवी म्हणतो ,
'माझा बाप करी त्यांची पूजा
दाखवी निवद सांजा .
अखेर न्याय मिळाला
या कवितेतून
निर्भयाच्या आत्मा बोलतोय
असा भास वाचकांना होतो .
कवी म्हणतो ,
'डगमगले नाही सत्य असत्यापुढे
अखेर दोषींचा झाला खात्मा '.
काव्यसंग्रहात वादळी वारा , उषःकाल , तळहात , ही वाट कुठे जाते , विश्वासघात ,शब्द मनातले , अशा अन निराशा , राबतो भाऊराया या कविता वाचकांना विचार करायला लावतात .
'सह्याद्रीचा छावा ' ही कविता परभणी जिल्ह्यातील शहीद जवान बालाजी आंबोरे यांना वीरमरण आले . त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लिहिली आहे .
' वज्रमूठ ' हा कवी महेश लांडगे
यांचा पहिला काव्यसंग्रह आहे .
सनय प्रकाशन आनंदवाडी - पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ रुपेश पवार यांनी समर्पक असं तयार केलेला आहे .
आपल्या पहिल्या काव्यसंग्रहातून सामाजिक स्थिती सह महान विचारांची प्रेरणा घेऊन , निसर्गाशी ऋणानुबंध ठेवत . शेतीमातीशी नाळ जुळवत, सर्वांच्या सुखाची आस धरणाऱ्या या काव्यसंग्रहात आपल्या शब्द सामर्थ्याने महेश लांडगे हे उत्तम रीतीने व्यक्त झालेले आहेत .त्यांच्या साहित्य लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा .🌹
---------------------
✍️एकनाथ लक्ष्मण गोफणे ८२७५७२५४२३
चाळीसगाव
Comments